महत्वाच्या बातम्या

 आरमोरीमध्ये सामाजिक दायित्वाचे दर्शन : नंदू नाकतोडे यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी वीरांना सुरक्षा कवच


- गरजू कुटुंबाला ताडपत्रीचे वाटप करत दिला तात्पुरता निवारा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / आरमोरी : वाढदिवस म्हटला की केक, शुभेच्छांचा वर्षाव आणि मित्रपरिवारासोबतचा दणक्यात उत्सव असेच चित्र सर्वत्र पाहायला मिळते. मात्र, आरमोरी येथील सामाजिक कार्यकर्ते नंदू नाकतोडे व त्यांच्या मित्रपरिवाराने आपला आनंद सामाजिक दायित्वातून साजरा करत समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. वाढदिवसाचे औचित्य साधून परिसरातील रुग्णवाहिका चालक व सर्पमित्रांना प्रत्येकी ४ लाख रुपयांचे सुरक्षा विमा कवच आणि एका गरजू कुटुंबाला ताडपत्रीचे वाटप करण्यात आले.

आरमोरी व परिसरातील रुग्णवाहिका चालक तसेच सर्पमित्र कोणत्याही वेळेचा विचार न करता, स्वतःचा जीव धोक्यात घालून नागरिकांचे प्राण वाचविण्यासाठी धावून जातात. अपघात असो, सर्पदंशाची घटना असो किंवा अन्य आपत्कालीन परिस्थिती असो, हे सेवाभावी कार्यकर्ते अविरत सेवेत तत्पर असतात. मात्र, या आपत्कालीन सेवेदरम्यान त्यांच्या स्वतःच्या सुरक्षेचा प्रश्न नेहमीच निर्माण होतो. ही बाब लक्षात घेऊन नंदू नाकतोडे मित्रपरिवाराच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आरमोरीतील रुग्णवाहिका चालक व सर्पमित्रांसाठी प्रत्येकी चार लाख रुपयांचे सुरक्षा विमा कवच काढण्यात आले. या उपक्रमामुळे आपत्कालीन सेवेत कार्यरत असलेल्या या वीरांना व त्यांच्या कुटुंबीयांना मोठा आर्थिक आधार मिळाला आहे.

दरम्यान, आरमोरी परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे एका गरीब कुटुंबाला तात्काळ निवाऱ्याची अत्यंत आवश्यकता असल्याची माहिती मित्रपरिवाराला मिळाली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून या कुटुंबाला ताडपत्रीचे वाटप करून तात्पुरता निवारा उपलब्ध करून देण्यात आला. या वेळेवर मिळालेल्या मदतीबद्दल संबंधित कुटुंबाने नंदू नाकतोडे व त्यांच्या मित्रपरिवाराचे मनापासून आभार मानले. वाढदिवसाच्या निमित्ताने स्वतःवर अवाजवी खर्च करण्याऐवजी समाजासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या सुरक्षेसाठी विमा कवच देणे आणि आपद्ग्रस्तांना मदतीचा हात देणे, या स्तुत्य उपक्रमाचे संपूर्ण आरमोरी परिसरात कौतुक होत आहे. अशा समाजोपयोगी उपक्रमांतून वाढदिवस साजरे करण्याची प्रेरणा इतरांनीही घ्यावी, अशी भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.





  Print






Related Photos