महत्वाच्या बातम्या

 किटाडी जंगलात भरदिवसा वाघाचा गायींवर हल्ला


- एका गर्भार गायीचा जागीच मृत्यू; दुसरी गंभीर जखमी, पशुपालकांमध्ये दहशत

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : जंगलात कळपासह चराईसाठी गेलेल्या दोन संकरित गर्भार गायींवर भरदिवसा पट्टेदार वाघाने प्राणघातक हल्ला केल्याची घटना रविवारी, ६ सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. लाखनी वन विकास महामंडळ (एफडीसीएम) अंतर्गत येणाऱ्या किटाडी जंगलातील बीट कक्ष क्रमांक ३८९ मध्ये घडलेल्या या घटनेत एका गायीचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरी गाय गंभीर जखमी झाली आहे. या घटनेमुळे गुराख्यांसह परिसरातील पशुपालकांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, किटाडी येथील पशुपालक देविदास पुंडलिक शेंडे यांच्या मालकीच्या या दोन्ही गर्भार गायी आहेत. नेहमीप्रमाणे गावातील गुराखी जनावरांचा कळप घेऊन किटाडी गावालगतच्या जंगल परिसरात चराईसाठी गेला होता. यावेळी कळपातील दोन गायींवर अचानक पट्टेदार वाघाने झडप घातली. वाघाने केलेल्या या अचानक हल्ल्यात एका गायीला गंभीर इजा होऊन तिचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरी गाय वाघाच्या तावडीतून कसाबसा बचावली. मात्र, तिच्या शरीरावर वाघाच्या हल्ल्यामुळे अनेक खोल जखमा झाल्या आहेत. जखमी गायीवर सध्या उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

पाच दिवसांत वाघाचा दुसरा हल्ला -
किटाडी परिसरात वाघाच्या हल्ल्याची ही काही पहिलीच घटना नाही. अवघ्या पाच दिवसांपूर्वी किटाडी शिवारात पट्टेदार वाघाने एका संकरित दुधाळ गायीवर हल्ला करून तिला जागीच ठार केले होते. ही गाय शेतकरी मधुकर रणदिवे यांच्या मालकीची होती. अल्पावधीतच पुन्हा पशुधनावर वाघाने हल्ला केल्याने परिसरातील पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण अधिकच तीव्र झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून किटाडी जंगलासह गावालगतच्या शिवारात पट्टेदार वाघाचा वावर वाढल असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

दोन वर्षांपासून पशुधनाची मोठी हानी -
गेल्या दोन वर्षांपासून किटाडी परिसरात वाघाच्या हल्ल्यांमध्ये शेतकरी आणि पशुपालकांचे लाखो रुपयांचे पशुधन गमवावे लागले आहे. वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे पशुपालक आर्थिक संकटात सापडले असून, जंगलालगतच्या शिवारात जनावरे चराईसाठी सोडतानाही त्यांना जीव मुठीत धरून जावे लागत आहे. विशेषतः भरदिवसा वाघाने पशुधनावर हल्ला केल्याने आता नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्नही गंभीर बनला आहे. शेतकरी, गुराखी आणि शेतमजूर यांना शेतात किंवा जंगलालगतच्या भागात काम करताना सतत वाघाच्या हल्ल्याची भीती वाटत आहे.

वाघाचा बंदोबस्त करा ग्रामस्थांची मागणी -
किटाडी परिसरातील वाढता वाघाचा वावर आणि सातत्याने होत असलेले पशुधनावरील हल्ले पाहता वन विभागाने तातडीने दखल घेऊन वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थ आणि पशुपालकांकडून करण्यात येत आहे.

वाघाच्या हल्ल्यांच्या घटना वारंवार घडत असूनही वन विभागाकडून अपेक्षित ती ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी प्रभावी गस्त वाढवावी, कॅमेरे लावावेत तसेच गावालगतच्या भागात नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

दरम्यान, वाघाच्या सततच्या वावरामुळे किटाडी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वन विभाग या परिस्थितीकडे गांभीर्याने कधी पाहणार, असा सवालही ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे





  Print






Related Photos