आरमोरीत चारचाकी वाहनातून दारूची तस्करी : ४.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत


- इंदिरानगर-बर्डी परिसरात पोलिसांची धडक कारवाई
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्ह्यातील दारूबंदीची कडक अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांनी अवैध दारू विक्री व वाहतूक करणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम उघडली आहे. याच मोहिमेअंतर्गत आरमोरी येथील इंदिरानगर बर्डी परिसरात आज, ५ ऑक्टोबर रोजी सहाय्यक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांच्या पथकाने सापळा रचून चारचाकी वाहनासह तब्बल ४ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, इंदिरानगर बर्डी येथून पांढऱ्या रंगाच्या ह्युंदाई कारमधून (क्रमांक MH ३७ BE १०४३) अवैध देशी दारूची वाहतूक होणार होती. या बातमीच्या आधारे सहाय्यक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे व त्यांच्या पथकाने इंदिरानगर बर्डी ते पाण्याच्या नहराकडे जाणाऱ्या सिमेंट रोडवर नाकेबंदी करून सापळा रचला. संशयित पांढऱ्या रंगाची कार नहराच्या दिशेने येत असल्याचे दिसताच पोलिसांनी अडथळा निर्माण करून वाहन थांबवले. चालकाची चौकशी केली असता त्याने आपले नाव रुपेश रेखचंद ठवरे (वय २९, रा. आरमोरी) असे सांगितले. वाहनाची पंचांसमक्ष तपासणी केली असता आतमध्ये विविध कंपन्यांच्या देशी दारूच्या २० पेट्या (एकूण २००० सिलबंद निपा) आढळून आल्या.
या कारवाईत पोलिसांनी ८८ हजार रुपये किमतीच्या रॉकेट देशी दारू संत्राच्या ११ पेट्या (११०० निपा), ४८ हजार रुपये किमतीच्या टायगर ब्राँड देशी दारूच्या ६ पेट्या (६०० निपा), २४ हजार रुपये किमतीच्या रॉकेट बडीशेपच्या ३ पेट्या (३०० निपा) आणि ३ लाख रुपये किमतीची ह्युंदाई एक्सेंट कार असा एकूण ४ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल घटनास्थळावरून जप्त केला.
आरोपी रुपेश ठवरे याच्याकडे अधिक विचारपूस केली असता, हा दारूचा साठा राहुल कैलास टेंभुर्णे (वय ४०, रा. इंदिरानगर बर्डी, आरमोरी) याच्या सांगण्यावरून नेत असल्याचे त्याने कबूल केले. याप्रकरणी आरमोरी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५(अ), ९८ आणि ८३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरार आरोपी राहुल टेंभुर्णे याचा शोध सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेशानुसार, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शुभम शिंदे करत आहेत.




Petrol Price




