धान पिकावर कीटकनाशक फवारणी करताना विषबाधा : ४५ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू


- सिहोरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना प्रकृती गंभीर; डॉक्टरांनी केले मृत घोषित
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : धान पिकावर कीटकनाशक औषधाची फवारणी करत असताना विषबाधा झाल्याने ४५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी, १० सप्टेंबर रोजी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मृत शेतकऱ्याचे नाव संजय मन्नुलाल कोहळे ४५, रा. कटोरी, ता. खैरलांजी, जि. बालाघाट असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संजय कोहळे हे गुरुवारी सकाळी आपल्या शेतात धान पिकावर कीटकनाशक औषधाची फवारणी करण्यासाठी गेले होते.
शेतात फवारणीचे काम सुरू असताना अचानक त्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागली. काही वेळातच त्यांची प्रकृती बिघडली आणि ते अचानक बेशुद्ध पडले. ही बाब लक्षात येताच त्यांना तातडीने उपचारासाठी सिहोरा येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.
मात्र, रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर संजय कोहळे यांना मृत घोषित केले. कीटकनाशकाच्या फवारणीदरम्यान विषबाधा झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक माहितीवरून समोर आले आहे.
या घटनेची नोंद सिहोरा पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणाचा तपास हवालदार कासदा करीत आहेत. धान पिकावर कीटकनाशकांची फवारणी करताना शेतकऱ्यांनी योग्य सुरक्षासाधनांचा वापर करावा, तसेच औषधाच्या वापराबाबत दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, अशी गरज या घटनेच्या पार्श्वभूमीवर अधोरेखित झाली आहे.




Petrol Price




