दीड लाख रूपयांच्या आत थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना दिली अर्ध्याच रक्कमेची कर्जमाफी, शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन


- बॅंक व्यवस्थापकाच्या गलथान कारभाराचा शेतकऱ्यांना फटका
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांची  बॅंक व्यवस्थापकाने चुकीची माहीती पुरविल्यामुळे  अर्ध्याच रक्कमेची कर्जमाफी मिळाली आहे. यामुळे शेतकऱ्यांवर  अन्याय झाला असून न्याय देण्याची मागणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
चामोर्शी तालुक्यातील लक्ष्मणपूर आणि विठ्ठलपूर येथील शेतकऱ्यांनी आज २३  आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून अप्पर जिल्हाधिकारी अशोक चौधरी यांना निवेदन सादर केले.
शेतकऱ्यांनी २०१२ ते २०१६ च्या दरम्यान पीककर्ज घेतले होते. शासनाने २०१७ मध्ये शेतकरी सन्मान कर्जमाफी योजना जाहिर करून शेतकऱ्यांचे दीड लाख रूपयांपर्यंतचे कर्ज माफ केल्याची घोषणा केली. शेतकऱ्यांनी तपशीलवार माहिती भरून ऑनलाईन अर्ज भरले.  मात्र पात्र शेतकरी दीड लाख रूपयांच्या आतील कर्जदार असतांनाही थकीत कर्जाच्या केवळ अर्धीच रक्कम माफ करण्यात आली. अर्धी रक्कम बॅंकेत जमा करण्याबाबत बॅंकेकडून शेतकऱ्यांना पत्र पाठविण्यात आले. यामुळे शेतकरी संभ्रमात आहेत. येनापूर येथील बॅंक आॅफ इंडियाच्या तत्कालीन व्यवस्थापकाच्या गलथान कारभारामुळेच शेतकरी कर्जमाफीपासून वंचित असून या प्रकरणात लक्ष देवून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 
निवेदन देताना संजय निखाडे, महेंद्र डाहुले, रामदास बल्की, राकेश वाकुडकार, तुळशिराम दिवसे, अशोक निखाडे, मधुकर गौरकार, गुलाब मडावी आदी उपस्थित होते. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-08-23


Related Photos