महत्वाच्या बातम्या

 ऑनलाइन गेमच्या नादात ४० लाख गमावले


- सुधारण्यासाठी नातेवाइकांकडे पाठविले; तरुणाने तेथेही ७६.००६ ग्रॅम सोने व रोख रक्कम लंपास केल्याचा आरोप

विदर्भ न्यूज एक्सप्रेस  
तालुका प्रतिनिधी / चामोर्शी : ऑनलाइन गेमच्या आहारी जाऊन तब्बल ३५ ते ४० लाख रुपये गमावलेल्या तरुणाला सुधारण्यासाठी नातेवाइकांकडे पाठविण्यात आले. मात्र, नातेवाइकांचा विश्वास संपादन केल्यानंतर त्याने त्यांच्या घरातील ७६.००६ ग्रॅम सोन्याचे दागिने तसेच रोख रक्कम लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार १४ सप्टेंबर रोजी उघडकीस आला. याप्रकरणी चामोर्शी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस तपास करीत आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, आदित्य रविकिरण यमसनवार २८ वर्ष, रा. पारवा, ता. घाटंजी, जि. यवतमाळ असे आरोपीचे नाव आहे. तो तक्रारदाराच्या मावसभावाचा मुलगा असल्याचे सांगण्यात आले आहे. तक्रारदार चामोर्शी येथे शासकीय कंत्राटदार म्हणून व्यवसाय करतात.

अभियांत्रिकीचे शिक्षण घेताना ऑनलाइन गेमची लागली सवय -
आदित्य यवतमाळ येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना ऑनलाइन गेमच्या आहारी गेला. या गेममध्ये त्याने सुमारे ३५ ते ४० लाख रुपये गमावल्याचे कुटुंबीयांच्या निदर्शनास आले. त्यामुळे कुटुंबीयांनी त्याला या सवयीपासून दूर करण्यासाठी आणि कामधंदा शिकविण्याच्या उद्देशाने मे २०२१ मध्ये चामोर्शी येथील नातेवाइकांकडे पाठविले.

चामोर्शीत आल्यानंतर तक्रारदाराने आदित्यला चांदापूर फाटा येथील साइट कार्यालयात देखरेख व कामकाज शिकण्यासाठी ठेवले. पुढे तो चामोर्शी परिसरातील विविध कामांवरही जाऊ लागला. नातेवाईक असल्याने त्याच्यावर विश्वास ठेवून तक्रारदाराने त्याच्याकडे काही आर्थिक व्यवहारांची जबाबदारीही सोपविली.मात्र, काही दिवसांनंतर घरातून तसेच अन्य ठिकाणी ठेवण्यात आलेल्या रोख रकमांमध्ये तफावत आढळू लागली. त्यानंतर कुटुंबीयांनी व्यवहारांची माहिती घेण्यास सुरुवात केली.

आईच्या निधनानंतर साडेसात तोळे दागिने गायब -
११ जानेवारी २०२३ रोजी तक्रारदाराच्या आईचे निधन झाले. त्यावेळी आई, पत्नी तसेच घरी आलेल्या सासूचे मिळून सुमारे साडेसात तोळे सोन्याचे दागिने गायब असल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आले.

घरात दागिन्यांचा शोध घेण्यात आला; मात्र ते मिळून आले नाहीत. आदित्य हा घरातीलच व्यक्ती असल्याने त्याच्यावर संशय घेऊन त्यावेळी पोलिसांत चोरीची तक्रार दाखल करण्यात आली नसल्याचे तक्रारीत नमूद आहे.दरम्यान, हे दागिने आदित्यने चामोर्शी येथील एका सराफाकडे नेऊन २ लाख ५५ हजार रुपयांना विकल्याची माहिती समोर आल्याचे तक्रारदाराने पोलिसांना सांगितले आहे.

जेसीबी भंगारात विकल्याचाही आरोप -
तक्रारदाराकडे एकूण तीन जेसीबी असून त्यांच्या देखभालीची जबाबदारी आदित्यकडे होती. डिसेंबर २०२३ मध्ये एका जेसीबीला आरमोरी येथील परिचित व्यक्तीला दरमहा ५० हजार रुपये भाड्याने दिल्याचे त्याने तक्रारदाराला सांगितले.

मात्र, संबंधित जेसीबीचे भाडे मिळत नसल्याने तक्रारदाराने याबाबत चौकशी केली. त्यावेळी आदित्यने उधारीच्या व्यवहारापोटी जेसीबी भंगारात विकल्याची माहिती मिळाल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.ऑनलाइन गेममध्ये मोठी रक्कम गमावलेल्या आदित्यला सुधारण्यासाठी नातेवाइकांकडे पाठविण्यात आले होते. मात्र, त्यानंतर नातेवाइकांच्या घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम गायब होण्यासह जेसीबीबाबतही गैरव्यवहार झाल्याचा आरोप समोर आल्याने कुटुंबीयांना धक्का बसला आहे.

या प्रकरणी १४ सप्टेंबर रोजी चामोर्शी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गणेश जंगले पुढील तपास करीत आहेत. चोरीला गेलेले सोने, रोख रक्कम तसेच जेसीबीच्या व्यवहारासंदर्भातील बाबींची पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे.





  Print






Related Photos