नांदगाव पोडे येथे स्वच्छतेचा जागर : स्वच्छता ही सेवा अभियानाला सुरुवात


विदर्भ न्युज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, या संदेशासह नांदगाव पोडे येथे गुरुवारी (१७ सप्टेंबर) सेवा संकल्प अभियान अंतर्गत ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाचा तालुकास्तरीय शुभारंभ करण्यात आला. अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, अंगणवाडी सेविका आणि ग्रामस्थांनी एकत्र येत स्वच्छता मोहिमेत श्रमदान केले.
अभियानाच्या शुभारंभप्रसंगी बल्लारपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी धनंजय साळवे, नायब तहसीलदार महेंद्र फुलझेले, नायब तहसीलदार अजय मल्लेलवार, विस्तार अधिकारी पंचायत पंढरीनाथ गेडाम, विस्तार अधिकारी कृषी नितीन ढवस, ग्रामपंचायत अधिकारी नयनपाल दुधे तसेच स्वच्छ भारत मिशनचे समन्वयक सुनील नुत्तलवार उपस्थित होते.
गावातील विविध भागांत स्वच्छता मोहीम राबवून परिसर स्वच्छ करण्यात आला. या उपक्रमात पंचायत समिती स्तरावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांसह ग्रामपंचायत कर्मचारी, शिक्षकवृंद आणि अंगणवाडी सेविकांनी सहभाग घेतला. ग्रामस्थांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत श्रमदान केले.
स्वच्छतेची सवय नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनावी आणि गावागावांत स्वच्छतेविषयी जनजागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने स्वच्छता ही सेवा अभियान राबविण्यात येत आहे. आगामी काळात बल्लारपूर तालुक्यातील विविध गावांमध्ये स्वच्छता व जनजागृतीचे उपक्रम सातत्याने राबविण्यात येणार आहेत.




Petrol Price




