अवैध डम्पिंग यार्ड हटविण्याऐवजी ग्रामसभा घेण्याचा आदेश


- मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर आजाद समाज पक्षाचा संताप; जल जीवन मिशनच्या कारभारावरही उपस्थित केले प्रश्न
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली तालुक्यातील मौजा नवेगाव ग्रामपंचायत हद्दीतील सर्वे क्रमांक ४८ वरील डम्पिंग यार्ड आणि घनकचरा व्यवस्थापन केंद्राच्या प्रकरणाला आता गंभीर वळण मिळाले आहे. सदर केंद्रासाठी आवश्यक कायदेशीर परवानग्या आणि ना-हरकत प्रमाणपत्रे (NOC) घेतल्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असताना, हे केंद्र हटविण्याऐवजी ग्रामसभा घेण्याचे निर्देश देण्यात आल्याने आजाद समाज पक्षाने प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नियमबाह्य केंद्राला ग्रामसभेच्या माध्यमातून वैधता देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप पक्षाचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी केला आहे.
आजाद समाज पक्षाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नवेगाव येथील डम्पिंग यार्डबाबत विविध प्रशासकीय, पर्यावरणीय आणि कायदेशीर मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कागदपत्रांमध्येही या केंद्राच्या कार्यपद्धतीबाबत आक्षेप नोंदविण्यात आल्याचा दावा पक्षाने केला आहे.
प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोटीसचा दाखला -
पक्षाच्या निवेदनानुसार, १८ फेब्रुवारी २०२६ रोजी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने संबंधित ग्रामपंचायतीला नोटीस बजावून पर्यावरणीय तसेच कायदेशीर बाबींच्या पालनाबाबत प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर ८ सप्टेंबर २०२६ रोजी माहितीच्या अधिकारातून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, नवेगाव येथील डम्पिंग यार्ड आणि घनकचरा विलगीकरण केंद्रासाठी आवश्यक परवानगी घेतल्याची नोंद उपलब्ध नसल्याचे पक्षाने म्हटले आहे.
या पार्श्वभूमीवर, प्रशासनाने प्रथम केंद्राच्या कायदेशीर स्थितीची तपासणी करून नियमबाह्य बाबी असल्यास कारवाई करणे अपेक्षित असताना ग्रामसभा घेण्याचा निर्णय का घेण्यात आला, असा सवाल आजाद समाज पक्षाने उपस्थित केला आहे.
अवैधता स्पष्ट असताना ग्रामसभा घेऊन काय साध्य होणार? -
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ग्रामसभा घेऊन त्यामध्ये संबंधित नागरिकांना आपले सर्व मुद्दे मांडण्याची संधी देण्याची भूमिका घेतली आहे. ग्रामसभेदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस बंदोबस्त तसेच संपूर्ण ग्रामसभेचे व्हिडिओ शूटिंग उपलब्ध करून देण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आल्याचे पक्षाने सांगितले.
मात्र, आजाद समाज पक्षाने या निर्णयावरच आक्षेप घेतला आहे. आवश्यक परवानग्या, NOC आणि इतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्याचे स्पष्ट पुरावे उपलब्ध नसतील, तर त्या केंद्राच्या वैधतेवर पुन्हा ग्रामसभेत चर्चा करण्याची गरज काय, असा प्रश्न राज बन्सोड यांनी उपस्थित केला. ग्रामसभा ही स्थानिक नागरिकांचे मत जाणून घेण्याची प्रक्रिया आहे; मात्र तिचा वापर नियमबाह्य पद्धतीने उभारलेल्या केंद्राला नंतर वैधता देण्यासाठी करता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
विशेष ग्रामसभा व महिला ग्रामसभेबाबतही प्रश्न -
या प्रकरणात विशेष ग्रामसभा तसेच महिला ग्रामसभा घेण्यात आल्याची माहिती उपलब्ध नसल्याचा दावा आजाद समाज पक्षाने केला आहे. तसेच संबंधित केंद्रासाठी आवश्यक NOC बाबतही माहितीच्या अधिकारातून स्पष्ट माहिती उपलब्ध नसल्याचे पक्षाच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यामुळे प्रशासनाने या संपूर्ण प्रकरणाची कागदपत्रांच्या आधारे सखोल चौकशी करावी आणि केंद्र उभारण्यासाठी आवश्यक सर्व परवानग्या प्रत्यक्षात घेतल्या आहेत की नाहीत, याची खातरजमा करावी, अशी मागणी पक्षाने केली आहे.
महसूल विभागाच्या जमिनीवर केंद्र उभारल्याचा आरोप -
या प्रकरणातील आणखी एक गंभीर मुद्दा म्हणून सर्वे क्रमांक ४८ च्या जमिनीचा उल्लेख करण्यात आला आहे. ही जमीन महसूल विभागाच्या मालकीची असून ७/१२ उताऱ्यावर ती तलाव म्हणून नमूद असल्याचा दावा आजाद समाज पक्षाने केला आहे.
सदर जमीन ग्रामपंचायतीच्या नावे कायदेशीररीत्या हस्तांतरित झाल्याचे पुरावे उपलब्ध नसतानाही त्या ठिकाणी घनकचरा व्यवस्थापन केंद्र उभारण्यात आल्याचा आरोप पक्षाने केला आहे. त्यामुळे जमिनीच्या मालकी हक्कासोबतच तिच्या वापराबाबतही प्रशासनाने स्पष्टता करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दोन हजार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न -
गेल्या सुमारे तीन वर्षांपासून या केंद्रामुळे परिसरातील नागरिकांना कचरा, दुर्गंधी आणि संभाव्य प्रदूषणाचा सामना करावा लागत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत असल्याचे पक्षाने म्हटले आहे. या केंद्राच्या परिसरातील जवळपास दोन हजार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून प्रशासनाने केवळ बैठका आणि चर्चांपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन न झाल्यास दुर्गंधी, डास-माशांचा प्रादुर्भाव, पाण्याचे संभाव्य प्रदूषण आणि सार्वजनिक आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने संबंधित विभागांनी प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा अहवाल तयार करावा, अशी मागणीही पक्षाने केली आहे.
ग्रामसभा घ्या; मात्र डम्पिंग यार्डला वैधता देण्यासाठी नव्हे -
राज बन्सोड यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करताना सांगितले की, ग्रामसभा घेण्यास आजाद समाज पक्षाचा विरोध नाही. मात्र, ग्रामसभा ही नियमबाह्य डम्पिंग यार्डला वैधता देण्याचे माध्यम होऊ नये. प्रशासनाकडे आवश्यक परवानग्यांबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आक्षेप नोंदविले आहेत आणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे प्रथम केंद्राची कायदेशीर स्थिती तपासून आवश्यक ती कारवाई करणे गरजेचे आहे.
ग्रामसभेत नागरिकांचे म्हणणे ऐकायचे असल्यास प्रशासनाने पोलीस बंदोबस्त आणि व्हिडिओ शूटिंगच्या उपस्थितीत सर्वांना आपली भूमिका मांडण्याची संधी द्यावी; मात्र अंतिम निर्णय संबंधित कायदे व नियमांनुसारच घेतला पाहिजे, असे बन्सोड यांनी स्पष्ट केले.
जल जीवन मिशनच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह -
या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आजाद समाज पक्षाने जल जीवन मिशनच्या कारभाराबाबतही प्रश्न उपस्थित केले आहेत. घनकचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित योजनांची अंमलबजावणी करताना संबंधित विभागांमध्ये आवश्यक समन्वय आणि नियमांचे पालन होत आहे का, याची चौकशी करण्याची मागणी पक्षाने केली आहे.
आंदोलनाचा इशारा -
दरम्यान, प्रशासनाने ग्रामसभेसाठी पोलीस बंदोबस्त आणि संपूर्ण बैठकीचे व्हिडिओ शूटिंग करण्याची व्यवस्था करण्याचे मान्य केल्याने या ग्रामसभेकडे नागरिकांसह विविध घटकांचे लक्ष लागले आहे.
नागरिकांच्या आरोग्याशी कोणत्याही प्रकारची तडजोड झाल्यास आजाद समाज पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी दिला आहे. पक्षाच्या मागण्या मान्य न झाल्यास जिल्हा परिषद कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल तसेच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयाला घेराव घालण्यात येईल, असेही निवेदनातून स्पष्ट करण्यात आले आहे.
या संदर्भात झालेल्या चर्चेत आजाद समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांच्यासह प्रभारी विनोद मडावी, युवा अध्यक्ष विवेक खोब्रागडे, नागसेन खोब्रागडे तसेच नवेगाव येथील जयेंद्र राऊत, हिरा मसराम, राणी गोपशेटवार, पवन गोपशेटवार, ममता आऊतकर, गुंडावर आणि पिंपडशेडे सर आदी उपस्थित होते.




Petrol Price




