महत्वाच्या बातम्या

 धान पिकातील तुडतुडा किडीचे एकात्मिक व्यवस्थापन करण्याचे कृषी विभागाचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात खरीप हंगामातील धान हे प्रमुख पीक असून यंदा १ लाख ७० हजार ३८६ हेक्टर क्षेत्रावर धानाची पेरणी करण्यात आली आहे. सध्या धान पिकामध्ये तपकिरी तुडतुडा (Brown Plant Hopper – BPH) या किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी धान पिकाची नियमित पाहणी करून तुडतुडा किडीचा प्रादुर्भाव आढळल्यास वेळेत एकात्मिक पद्धतीने उपाययोजना कराव्यात, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

तपकिरी तुडतुडा ही कीड प्रामुख्याने धानाच्या बुंध्याजवळ आणि पानांच्या आड राहते. प्रौढ तुडतुडे तसेच त्यांची पिल्ले धानाच्या खोडातील रस शोषून घेतात. परिणामी प्रादुर्भाव झालेल्या भागातील पाने पिवळी पडतात आणि झाडांची वाढ खुंटते. प्रादुर्भाव तीव्र झाल्यास धानाची झाडे वाळून तपकिरी रंगाची दिसू लागतात. मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्यास शेतामध्ये हॉपर बर्न सदृश्य परिस्थिती निर्माण होऊन उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता असते.

शेतातील एखाद्या विशिष्ट भागातून किंवा बांधापासून पीक वाळण्यास सुरुवात झाल्यास तुडतुडा किडीचा प्रादुर्भाव आहे का, याची तातडीने तपासणी करावी, असे कृषी विभागाने म्हटले आहे.

आठवड्यातून दोन वेळा पिकाची पाहणी करा -
तुडतुडा किडीचा प्रादुर्भाव वेळीच लक्षात येण्यासाठी शेतकऱ्यांनी आठवड्यातून किमान दोन वेळा धान पिकाची पाहणी करावी. विशेषतः धानाच्या बुंध्याजवळ कीड आहे का, याची तपासणी करावी. तसेच बांधावरील आणि शेतातील दाट भागात विशेष निरीक्षण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नत्रयुक्त खताचा अतिरिक्त वापर टाळावा -
नत्रयुक्त खतांचा अवाजवी वापर टाळून शिफारशीनुसार संतुलित खत व्यवस्थापन करावे. जास्त प्रमाणात नत्राचा वापर केल्यास धान पिकाची कोवळी व दाट वाढ होते. त्यामुळे तुडतुडा किडीच्या प्रादुर्भावासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे खतांचा वापर पिकाच्या गरजेनुसार करणे आवश्यक आहे.

योग्य पाणी व्यवस्थापन महत्त्वाचे -
धानाच्या शेतात सतत मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहणार नाही, याची काळजी घ्यावी. पिकाच्या अवस्थेनुसार योग्य पाणी व्यवस्थापन करावे. तुडतुडा नियंत्रणासाठी कीटकनाशकांचा वापर करण्यापूर्वी शेतातील पाणी काढून टाकावे आणि फवारणी धानाच्या मुळाजवळ करावी, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.

प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर -
तपकिरी तुडतुड्यामुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी लवकर परिपक्व होणाऱ्या वाणांचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. भात पिकानंतर डाळवर्गीय पिकांची पेरणी करावी. तसेच तुडतुडा नियंत्रणासाठी प्रति हेक्टर ४० पिवळे चिकट सापळे लावावेत.

याशिवाय प्रति हेक्टर दोन प्रकाश सापळे लावण्याची शिफारस करण्यात आली आहे. हे प्रकाश सापळे संध्याकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत कार्यान्वित ठेवावेत. अधूनमधून भात पिकात साचलेले पाणी काढून देणेही तुडतुडा नियंत्रणाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.

जैविक नियंत्रणाचा अवलंब करण्याचे आवाहन -
कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार तपकिरी तुडतुडा नियंत्रणासाठी ३  टक्के कडुनिंब तेल ४ मिली प्रति १५  लिटर पाण्यात मिसळून फवारणी करण्याची शिफारस करण्यात आली आहे. तसेच तुडतुडा नियंत्रणासाठी सायरोटोरिनस लिव्हिडिपेंनिस या परजीवीचा वापर करता येतो. त्याची प्रति एकर १ लाख अंडी १० दिवसांच्या अंतराने सोडण्याची शिफारस करण्यात आली आहे. यामुळे जैविक पद्धतीने किडीचे व्यवस्थापन करण्यास मदत होऊ शकते.

रासायनिक नियंत्रण करताना काळजी घेण्याचे आवाहन -
तुडतुडा किडीचा प्रादुर्भाव आढळल्यास रासायनिक नियंत्रणाची उपाययोजना कृषी विभाग अथवा कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसारच करावी. अनावश्यक किंवा अवाजवी कीटकनाशकांचा वापर टाळावा. कीटकनाशकांची फवारणी करण्यापूर्वी शेतातील पाणी काढून टाकणे आणि औषधाची फवारणी धानाच्या बुंध्याजवळ होईल याची काळजी घेणे आवश्यक आहे.

तुडतुडा किडीचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर पिकाचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी पीक निरीक्षण, संतुलित खत व्यवस्थापन, योग्य पाणी व्यवस्थापन, चिकट व प्रकाश सापळे तसेच जैविक आणि आवश्यकतेनुसार रासायनिक नियंत्रण अशा एकात्मिक उपाययोजनांचा अवलंब करावा. धान पिकात तुडतुडा किडीची लक्षणे आढळल्यास जवळच्या कृषी अधिकारी किंवा कृषी सहाय्यकांशी संपर्क साधून मार्गदर्शन घ्यावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.





  Print






Related Photos