स्मार्ट सिटी प्रकल्पात सामान्य माणसाला अत्युच्च्य दर्जाच्या सुविधा : देवेंद्र फडणवीस


-  स्मार्ट सिटी प्रकल्पाचा शुभारंभ
- प्रकल्पात नागरिक बेघर होणार नाहीत
- प्रत्येकाला योग्य मोबदला मिळेल
-  अर्बन महानेट प्रकल्पाला लवकरच सुरुवात
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर :
स्मार्ट सिटी प्रकल्प एकात्मिक विकासाचे मॉडल ठरणार असून या प्रकल्पात सामान्य माणसाला अत्युच्च्य दर्जाच्या सेवा उपलब्ध होणार आहेत. प्रकल्पात जमीन किंवा घर जाणाऱ्या कुठल्याही नागरिकास बेघर केले जाणार नसून प्रत्येकाला जमिनीचा योग्य मोबदला मिळेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली.
नागपूर महानगरपालिका, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान कॉर्पोरेशन लिमिटेड, महाराष्ट्र शासन आणि नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने अटल बिहारी वाजपेयी सिटी ऑपरेशन सेंटरचे नामकरण आणि नागपूर सेफ आणि स्मार्ट सिटी प्रोजेक्टचा लोकार्पण सोहळा, स्मार्ट सिटी अभियान अंतर्गत प्रोजेक्ट टेंडर शूअर आणि प्रोजेक्ट होम स्वीट होम तसेच अमृत अभियान अंतर्गत अधिकृत- अनाधिकृत स्लम वस्त्यांमध्ये पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ व भूमिपूजन भरतवाडा टी पॉईंट, पुनापूर नागपूर पूर्व या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.
  केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, आमदार कृष्णा खोपडे, अनिल सोले, डॉ मिलिंद माने, सत्तापक्ष नेता संदीप जोशी, स्थायी समिती अध्यक्ष विरेंद्र कुकरेजा, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, नासुप्र सभापती शीतल उगले, मनपा आयुक्त अभिजीत बांगर, मुख्य कार्यकारी अधिकारी स्मार्ट सिटी डॉ.रामनाथ सोनवणे तसेच नगरसेवक उपस्थित होते.
सातशे कोटी रुपये खर्च करुन देशातील उत्तम प्रकल्प नागपुरात साकारत आहे. या प्रकल्पात येणाऱ्या सर्व अडचणी दूर करण्यात येतील. नागरिकांच्या समस्यांची वेळीच दखल घेऊन त्या सोडविण्यासाठी शासन सकारात्मक पाऊल टाकणार आहे. शेवटच्या माणसाला सोबत घेऊन स्मार्ट सिटी प्रकल्प विकसित केल्या जाईल, अशी खात्री मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. स्मार्ट सिटी अंतर्गत त्याभागातील सामान्य माणसांचे जीवनमान उंचावण्यासाठी सर्व सोयीसुविधा पुरविण्यात येणार आहेत. शिक्षणाची सोय, वीज, पाणी, खेळाचे मैदान, उत्तम बाजारपेठ यांचा त्यात समावेश राहील.
संपूर्ण महाराष्ट्रात अर्बन महानेट प्रकल्प सुरु करण्यात येणार आहे. याअंतर्गत सर्व शासकीय कार्यालय, जिल्हा परिषद शाळा, महाविद्यालये यांना ब्रॉडबँड कनेक्टेविटी देण्यात येणार आहे. याद्वारे शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये स्मार्ट होतील. या प्रकल्पाचा लाभ स्मार्ट सिटीला होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, नागपूर शहरातील पारडी हा झोपडपट्टी असणारा भाग आता स्मार्ट सिटीच्या माध्यमातून आदर्श शहरात बदलणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून 50 हजार लोकांना त्यांच्या हक्काचे घर मिळणार आहे. तसेच मेट्रोचे देखील काम वेगाने सुरु आहे. पारडी येथे भव्य व सुसज्ज बाजारपेठ निर्मितीला मंजुरी मिळाली असून त्याचे काम लवकरच सुरु करण्यात येईल. नागपूर शहर एकात्मिक विकासाचे मॉडल ठरत असून मागास क्षेत्राचे विकास स्मार्ट सिटीच्या माध्यमातून होत आहे. या प्रकल्पात येणाऱ्या कोणाचेही नुकसान होणार नाही, अशी ग्वाही गडकरी यांनी दिली.
मिहान प्रकल्पात 22-23 हजार तरुण-तरुणींना रोजगार उपलब्ध करुन दिला असून येत्या काळात 25-30 हजार तरुण-तरुणींना रोजगार उपलब्ध करुन देण्याचे नियोजन असल्याचे गडकरी यांनी सांगितले. स्मार्ट सिटी प्रकल्पात 52 किमीचे रस्ते, 29 पुल, 7 हजार एलईडी लाईट्स, 24 तास पाणी पुरवठा, सायकल व बाईक ट्रॅक उभारले जाणार आहेत. या कामामुळे नागपूर शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा प्राप्त होणार आहेत. नागपूरचे चित्र पालटणार असून मेरा नागपूर बदल रहा है, असे गौरवोद् गार त्यांनी काढले.
आमदार कृष्णा खोपडे म्हणाले, स्मार्ट सिटी अंतर्गत पूर्व नागपूरचा सर्वांगिण विकास होत आहे. यासाठी नागरिकांचे सहकार्यदेखील महत्वाचे आहे. येत्या काळात शहरातील अप्रगत भागांचा देखील विकास होणार आहे. पूर्व नागपूरच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 6 हजार कोटीचे प्रकल्प मंजूर केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी म्हणाले, पाणी पुरवठा योजनेचा पथदर्शी प्रकल्प स्मार्ट सिटीत उभारत असून नागपुरात होत असलेल्या विकास कामांमुळे नागपूर देशात प्रथम आहे.
1730 एकर जागेवर स्मार्ट सिटी प्रकल्प उभारला जात असून हा प्रकल्प 18 ते 20 महिण्यात पूर्ण करण्यात येणार आहे. 520 कोटीच्या या प्रकल्पामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा निर्माण करण्यात येणार असल्याचे मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले. या प्रकल्पासाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींसाठी आयडीया चॅलेंज स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

असा असेल स्मार्ट सिटी प्रकल्प

पूर्व नागपुरात 1730 एकर वर स्मार्ट सिटी प्रकल्प उभारला जाणार आहे. पार्किंग, पाणीपुरवठा व मलनिस्सारण, सायकल व बाईक ट्रॅक, स्मार्ट रस्ते व दळणवळण व्यवस्था, जॉगिंग ट्रॅक, खेळाची मैदाने, स्मार्ट सदनिका, जागतिक दर्जाचे शिक्षण व आरोग्य सुविधा या ठिकाणी असणार आहे. भांडेवाडी येथे बायोमायनिंग प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पात कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. यासाठी 35 कोटींचा निधी दिला आहे. या प्रकल्पामुळे भांडेवाडी कचरा मुक्त होणार आहे. अमृत योजनेत 274 कोटींचा प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. शहरातील झोनच्या गरजेनुसार पाणीपुरवठा केला जाणार आहे. हा प्रकल्प 24 बाय 7  असणार आहे. 
   महाराष्ट्र शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विभाग, नागपूर पोलीस आयुक्तालय व नागपूर स्मार्ट आणि सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर सेफ आणि स्मार्ट सिटी प्रकल्प राबविण्यात येत आहे.
प्रकल्पाचा खर्च- सुमारे 520 कोटी रुपये खर्च (पाच वर्षाच्या देखभाल व दुरुस्तीच्या खर्चासह), 1045 किमी लांबीचे Optical Fiber  Network टाकण्यात आले. नागपूर पोलीस आयुक्तालय व नागपूर महानगरपालिका क्षेत्रात 706 जंक्शन्स वर 3674 CCTV Surveillance Cameras बसविण्यात आले. 140 Wi-Fi Hotspots निर्माण करण्यात आले. 53 Variable Messages Signboard (VaMS) उभारण्यात आले. 10 Environmental Sensors बसविण्यात आले. 56 ठिकाणी Public Announcement System निर्माण करण्यात आली. 5 मोबाईल सर्व्हेलन्स व्हॅन आणि 5 ड्रोन, 20 स्मार्ट बिन्स, 65 सिटी किऑस्क (City Kiosk), 383 स्मार्ट लाईट्स, स्मार्ट पार्कीक (67 कार), स्मार्ट ट्रान्सपोर्ट (227 बसेस), महानगरपालिका मुख्यालय City operation center तयार करण्यात आाले. नागपूर पोलीस विभागासाठी Command and Control Center चे बांधकाम असणार आहे.
प्रकल्पाचे फायदे : या प्रकल्पामुळे गुन्ह्यांचा शोध व उकल होण्यास मदत होत आहे. शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी Intelligent Traffic Management System या यंत्रणेमार्फत मदत होत आहे. महानगरपालिका मुख्यालयात तयार करण्यात आलेल्या City Operation Center मार्फत  नागरी सुविधा जलद गतीने पुरविण्यास मदत होत आहे. गतिमान, पारदर्शी आणि लोकाभिमुख प्रशासनाची संकल्पना प्रत्यक्षात आली आहे. प्रकल्प कंत्राटदार : मेसर्स लार्सन ॲण्ड टुब्रो (एल ॲण्ड टी) आहेत.  Print


News - Nagpur | Posted : 2019-02-03


Related Photos