महत्वाच्या बातम्या

 राज्यात आता १०८ रुग्णवाहिकांची संख्या होणार १ हजार ७५६


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / अकोला : राज्यातील नागरिकांसाठी १०८ रुग्णवाहिका जीवनदायिनी ठरली आहे. सद्यस्थितीत ९३७ रुग्णवाहिका राज्याच्या विविध भागात कार्यरत असून, नव्याने ८१९ रुग्णवाहिका येणार असल्यामुळे एकूण १ हजार ७५६ रुग्णवाहिका राज्याच्या विविध भागात सेवा देणार आहेत.

ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट, बेसिक लाईफ सपोर्ट व बाईक ॲंब्युलन्स या प्रकारात ही सेवा पुरवली जाते. या सेवेत नवजात बालकांसाठी विशेष रुग्णवाहिका व बोट ॲंब्युलन्सचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. समुद्र, व नद्यांमध्ये बुडून मृत्युमुखी पडणाऱ्या नागरिकांची वाढती संख्या लक्षात घेता, नव्याने ३६ बोट ॲम्बुलन्स विविध अपघाती समुद्र किनारे व नदी पात्रांमध्ये तैनात होणार आहे. त्याचबरोबर नवजात शिशूंसाठी २५ रुग्णवाहिका नव्याने येणार आहेत. रुग्णवाहिकेची संख्या वाढल्याने १०८ क्रमांकावर कॉल केल्यानंतर रुग्णवाहिकेचा प्रतिसाद देण्याची वेळ कमी होणार आहे.

शासनावर ३० कोटीचा अतिरिक्त बोजा वाढणार -
दहा वर्षापुर्वी १०८ रुग्णवाहिका सुरु करण्यासाठी निविदा काढण्यात आली होती. त्याचा सर्व भांडवली खर्च शासनाच्या वतीने करण्यात आला होता. नविन निविदेनुसार ५१ टक्के भांडवली खर्च सेवा पुरवठा करणाऱ्या संस्थेला करावा लागणार आहे. त्यामुळे सदर निविदा १० वर्षांसाठी काढण्यात आली आहे. १०८ रुग्णवाहिकेसाठी सद्यस्थितीत प्रती महिना ३३ कोटी रुपये शासनाला खर्च करावे लागत होते. रुग्णवाहिकेच्या वाढत्या संख्येमुळे प्रती महिना ६३ कोटी रुपये शासनाला खर्च करावे लागणार आहे. एकंदरीतच अतिरिक्त ३० कोटी प्रतीमहिना शासनाला खर्च करावा लागणार आहे.

सद्यस्थितीत रुग्णवाहिकांची संख्या -
ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट : २३३
बेसिक लाईफ सपोर्ट : ७०४
बाईक ॲम्बुलन्स : ३३

नव्याने वाढणाऱ्या रुग्णवाहिकांची संख्या -
ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट : २५
बेसिक लाईफ सपोर्ट : ५७०
बाईक ॲम्बुलन्स : : १६३
नवजात शिशुंसाठी रुग्णवाहिका : २५
बोट ॲम्बुलन्स : ३६





  Print






News - Rajy




Related Photos