गडचिरोली तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक वाघाला ठार करा : आमदार डॉ.होळी


-  वनसंरक्षक व उपवनसंरक्षक यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
आत्तापर्यंत १३ निष्पाप लोकांचे बळी घेणाऱ्या त्या नरभक्षक वाघाला तात्काळ ठार करावे व कोणतीही चूक नसताना केवळ वनाधिकाऱ्यांच्या दुर्लक्षपणामुळे  लोकांचा जीव गेल्याने जिल्ह्यातील वनसंरक्षक व उप वनसंरक्षक यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी  आमदार डॉ. होळी यांनी सरकारकडे केली आहे. 
पुन्हा नरभक्षक वाघाने एका निष्पाप शेतकऱ्याचा बळी घेऊन आपली दहशत कायम ठेवली केली आहे. आमदार डॉ. होळी यांनी याबाबत वारंवार शासनाकडे पाठपुरावा केला. वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या भेटी, चर्चा व बैठका घेतल्या. मात्र अजूनपर्यंत त्या वाघाला पकडण्यात यश आले नाही. आणखी  किती लोकांचे बळी घेईल याची आता वाट बघायची का ? गडचिरोली जिल्ह्यातील लोकांचे जीव असे वाऱ्यावर पडले आहेत का ?  हाच वाघ इतर जिल्ह्यात असता तर आतापर्यंत त्याला केव्हाच ठार करण्यात आले असते मात्र गडचिरोली जिल्ह्यात अशा घटना घडत असल्याने याकडे पूर्ण दुर्लक्ष करण्यात येत आहे आता लोकांचा अंत पाहू नका या नरभक्षक वाघाला ठार करणे योग्य असल्याने त्याला तात्काळ ठार करावे अशी मागणी त्यांनी केली आहे. 
ठाकरे सरकारचे याकडे पूर्णतः दुर्लक्ष असून वारंवार पाठपुरावा करूनही कोणत्याही मंत्र्याने याकडे लक्ष दिले नाही. गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांच्यापुढे हा प्रश्न आला असता त्यांनी फक्त मोघमपणे वनरक्षकांना सूचना केली तसेच जिल्ह्याचे भूमिपुत्र असलेले ना.विजय वडेट्टीवार यांनीही  याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले असून आपल्याच जिल्हयातील  लोकांना मरणाच्या दारावर मोकळे सोडल्याचे दिसून येत आहे.  केवळ एका वर्षात एकाच तालुक्यातील १३ लोकांचा बळी या नरभक्षक वाघाने घेतला आहे. मात्र शासन याबाबत गंभीर नाही त्यामुळे सरकारने तातडीने दखल घेवून निष्पाप जीव जाणाऱ्या लोकांचे जीव वाचवावे व त्या नरभक्षक वाघाला ठार करण्याचे आदेश तातडीने द्यावे अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. होळी यांनी शासनाला केली आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2021-09-08
Related Photos