महत्वाच्या बातम्या

 देशात वाघांच्या संख्येत वाढ : पंतप्रधान मोदींनी जारी केली आकडेवारी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस

वृत्तसंस्था / नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी प्रोजेक्ट टायगरला ५० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्य देशातील वाघांची ताजी आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार देशात सध्या ३ हजार १६७ वाघ (२०२२ पर्यंतची आकडेवारी) आहेत. २०१८ मध्ये हाच आकडा २ हजार ९६७ एवढा होता. याचाच अर्थ गेल्या चार वर्षांत वाघांच्या संख्येत २०० ने वाढ झाल्याचे दिसते. 

प्रोजेक्ट टायगरला ५० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्य मोदींनी एक विशेष नाणेही जारी केले. तसेच इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सचीही घोषणा केली. हिंदुस्थानने वाघांचे संवर्धन, संगोपनच केले नाही तर त्यांची संख्या वाढण्यासाठी अनुकुल परिस्थिती आणि वातावरणही निर्माण केल्याचे यावेळी मोदी म्हणाले. प्रोजेक्ट टायगरचे यश केवळ हिंदुस्थानसाठी नव्हे तर संपूर्ण जगासाठी अभिमानस्पद आहे. हिंदुस्थान असा देश आहे जिथे निसर्गाचे रक्षण करणे संस्कृतीचा भाग समजला जातो, असेही त्यांनी यावेळी अभिमानाने सांगितले.

व्याघ्र प्रकल्प असणाऱ्या अनेक देशांमध्ये वाघांची संख्या स्थिर आहे किंवा कमी होतेय, परंतु हिंदुस्थानमध्ये ती वेगाने वाढत आहे. याचे कारण आपली परंपरा, संस्कृती आणि पर्यावरण व जैवविविधतेबाबतचा नैसर्गिक आग्रह असल्याचे ते म्हणाले. तसेच आशियाई सिंह असणारा हिंदुस्थान जगातील एकमेव देश आहे. वाघांप्रमाणे सिंहांची संख्याही वाढत असून २०१५ मध्ये ती ५२५ होती, तर २०२० मध्ये ६७५ पर्यंत पोहोचली. यासह बिबट्याच्या संख्येतही चार वर्षात ६० टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले.

खास लुकची चर्चा

तत्पूर्वी सकाळी त्यांनी चामराजनगर जिल्ह्यातील बांदीपूर व्याघ्र प्रकल्पाचाही दौरा केला आणि वाघांच्या संवर्धन कार्यात सहभागी असलेल्या फ्रंटलाइन फील्ड स्टाफशी व स्वयंसेवी संस्थांच्या सदस्यांशीही चर्चा केली. ओपन जीपमधून मोदी सर्वत्र फिरले आणि दुर्बिणीद्वारे त्यांनी निरीक्षणही केले. यावेळी टोपी, टी-शर्ट आणि ट्राउझर्स घालून आलेल्या मोदींच्या लुकची चांगलीच चर्चा झाली.

यादरम्यान त्यांनी तामिळनाडूच्या सीमेला लागून असलेल्या मुदुमलाई नॅशनल पार्कला आणि थेप्पाकडू एलिफंट कॅम्पलाही भेट दिली. द एलिफंट व्हिस्पर्स या ऑस्कर विजेत्या लघु माहितीपटाचे चित्रीकरण याच ठिकाणी झाले आहे.





  Print






News - Rajy




Related Photos