एटापल्ली तालुक्यातील १५ पैकी ११ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त


- पशुधन संकटात
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
मनिष येमुलवार/ भामरागड
: अतिदुर्गम भाग असलेल्या एटापल्ली तालुक्यातील  शेतकऱ्यांकडे पशुधनाची संख्या मोठी आहे. या पशुधनावर उपचारासाठी तालुक्यात १५ पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. मात्र यापैकी केवळ चार पशुवैद्यकीय दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी असून उर्वरीत ११  पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. ही बाब सुरज जक्कुलवार यांनी मागितलेल्या माहिती अधिकारांतर्गत पुढे आली आहे. पशुवैद्यकीय  अधिकाऱ्यांची तब्बल ११ पदे रिक्त असल्यामुळे पशुपालकांना जनावरांवर उपचारासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे.
एटापल्ली तालुक्यातील गट्टा, तोडगट्टा, हेडरी, जारावंडी, कचलेर, कोटमी, दोलंदा, कसनसूर, घोटसूर, बुर्गी, एटापल्ली या एकूण ११ पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये पशुवैद्यकीय अधिकारी नाही. हालेवारा, तोडसा, बिडरी, गेदा या चार ठिकाणी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 
एटापल्ली तालुका मुख्यालयापासून ३५ किमी अंतरावर असलेल्या गट्टा सारख्या दुर्गम भागात किमान पशुवैद्यकीय दवाखानासुध्दा नाही. गट्टा येथील सुरज जक्कुलवार यांनी दिलेल्या माहितीनुसार मागील चार ते पाच वर्षांपासून या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा पशुवैद्यकीय अधिकारी नाही. दवाखान्याची इमारत पूर्णपणे पडलेली आहे.  यामुळे परिसरातील गावांना त्रास सहन करावा लागतो. शासनाच्या योजनांची पूर्णपणे अंमलबजावणी होत नाही. केवळ एकाच तालुक्यातील ११ पदे रिक्त असतील तर संपूर्ण जिल्ह्यातील काय स्थिती असेल याचा अंदाज न लावलेलाच बरा . यामुळे पाळीव जनावरांवर उपचार करणे कठीण झाले आहे. तालुक्यातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी पशुपालकांमधून होत आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-12-09


Related Photos