२०२१ पोलीस भरती प्रक्रियेत आणखी एक बनवाबनवीचे प्रकरण : डमी उमेदवार बसवला परीक्षेला


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई : २०२१ मध्ये झालेल्या मुंबई पोलीस भरती प्रक्रियेत झालेल्या बनवाबनवीचे प्रकरण अजूनही संपलेले नाही. त्या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्याची प्रक्रिया अद्यापही सुरू असून नुकताच एका उमेदवाराचा बनावपणा उघडकीस आला आहे. केदारलिंग शिंदे या उमेदवारासाठी लेखी परीक्षा दुसऱ्यानेच दिल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे भोईवाडा पोलीस ठाण्यात शिंदे व त्याच्यासाठी लेखी परीक्षा देणारा, असे दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू आहे. २०१९ ची भरती प्रक्रिया २०२१ मध्ये पार पडली होती. १ लाख ९ हजार उमेदवारांमधून १०७६ जणांची निवड झाली होती. या निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्याची प्रक्रिया अद्याप सुरू आहे. सध्या मुंबई पोलिसांची भरतीप्रक्रिया सुरू असून त्याकरिता नायगाव येथे पोलीस भरती कक्ष सुरू करण्यात आले आहे. त्या कक्षात ३० जानेवारीला चार दिवसांपूर्वी ५४ जणांना नियुक्तीपत्र देण्यासाठी बोलविण्यात आले होते. त्यावेळी भरती प्रक्रियेदरम्यान केलेली व्हिडीओग्राफी तपासण्यात आली. त्यात हिंगोली येथील केदारलिंग शिंदे या उमेदवाराचा झोल उघडकीस आला. शिंदेसाठी डमी उमेदवाराने लेखी परीक्षा दिल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे याबाबत केदारलिंगकडे चौकशी केल्यावर त्याने लेखी परीक्षेत डमी उमेदवार बसविल्याचे उघटकीस आले.
मुंबई पोलिसांनी २०२१ मध्ये घेतलेल्या भरतीप्रक्रियेत अनेक डमी उमेदवार सहभागी झाल्याचे समोर आले आहे. भोईवाडा पोलीस ठाण्यात वर्षभरात १६ गुन्हे दाखल झाले, असून अनेकांवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.
News - Rajy