शेतकऱ्यांना आता स्वतः करता येणार ई-पीक पाहणी


- डीसीएस एमएच अॅपद्वारे शेतातच पीक पेरा नोंदणी; महसूल व कृषी विभागाकडून सात सोप्या पायऱ्यांची नियमावली
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : शेतकऱ्यांना आपल्या शेतातील ई-पीक पाहणी अथवा पीक पेरा नोंदणी करण्यासाठी आता कोणत्याही बाह्य व्यक्ती, सहायक किंवा इतर घटकावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही. तसेच पीक नोंदणीसाठी तासनतास प्रतीक्षा करण्याचीही आवश्यकता राहणार नाही. महसूल व कृषी विभागाने ई-पीक पाहणीची प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि डिजिटल केली असून, तंत्रज्ञानाची जाण असलेल्या शेतकऱ्यांना आता स्वतःच्या मोबाइलवरूनच थेट शेतात जाऊन पीक पेरा नोंदविता येणार आहे.
अॅग्रिस्टेक योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी डीसीएस एमएच (Digital Crop Survey – Maharashtra) या मोबाइल अॅपच्या माध्यमातून ई-पीक पाहणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ११ सप्टेंबरपासून शेतकरी आपल्या मोबाइलवर या अॅपचा वापर करून स्वतःच्या शेतातील पिकाची नोंदणी करू शकतात. यामुळे ई-पीक पाहणीची प्रक्रिया अधिक गतिमान होण्याबरोबरच पीक नोंदणीमध्ये पारदर्शकता वाढण्यास मदत होणार आहे.
सात सोप्या पायऱ्यांत ई-पीक पाहणी -
शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करणे सुलभ व्हावे यासाठी कृषी विभागाने सात टप्प्यांची सोपी प्रक्रिया निश्चित केली आहे.
१. अॅप डाउनलोड किंवा अपडेट करा
सर्वप्रथम मोबाइलमध्ये डीसीएस एमएच अॅपची नवीनतम आवृत्ती डाउनलोड किंवा अपडेट करणे आवश्यक आहे.
२. भाषा निवडून शेतकरी म्हणून लॉगिन करा
अॅपमध्ये आपल्या पसंतीची भाषा निवडल्यानंतर शेतकरी म्हणून साईन इन करावे. त्यानंतर Farmer ID टाकून ओटीपीच्या माध्यमातून लॉगिन करावे.
३. एम-पिन किंवा बायोमेट्रिक लॉक सेट करा
अॅपच्या सुरक्षित वापरासाठी एम-पिन किंवा बायोमेट्रिक लॉक सेट करणे आवश्यक आहे.
४. आधार पडताळणी करा
आधार क्रमांक प्रविष्ट करून ओटीपीच्या माध्यमातून आधारचे व्हेरिफिकेशन पूर्ण करावे.
५. फेस ऑथेंटिकेशन पूर्ण करा
यानंतर फेस ऑथेंटिकेशनच्या माध्यमातून चेहरा पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करावी.
६. शेताच्या प्लॉटमध्ये पोहोचा
पीक पेरा नोंदणी करण्यासाठी संबंधित शेताच्या प्लॉटच्या २० मीटरच्या आत प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्यक आहे.
७. पीक पेरा नोंदणी पूर्ण करा
शेताच्या निश्चित क्षेत्रात पोहोचल्यानंतर अॅपवर आवश्यक माहिती भरून ई-पीक पाहणीची नोंदणी पूर्ण करावी.
मोबाइलच्या आवश्यक परवानग्या सुरू ठेवणे गरजेचे -
ई-पीक पाहणी करताना शेतकऱ्यांनी काही महत्त्वाच्या बाबींची काळजी घेणे आवश्यक आहे. मोबाइलमध्ये डीसीएस एमएच अॅपची नवीनतम आवृत्ती असावी. तसेच अॅपला आवश्यक असलेल्या लोकेशन, कॅमेरा आणि स्टोरेज या परवानग्या सुरू असणे अनिवार्य आहे.
विशेषतः पीक पेरा नोंदणी करताना शेतकरी संबंधित प्लॉटच्या २० मीटरच्या आत असणे आवश्यक आहे. मोबाइलचे लोकेशन बंद असल्यास किंवा आवश्यक परवानग्या उपलब्ध नसल्यास अॅपकडून नोंदणीची प्रक्रिया स्वीकारली जाणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी सुरू करण्यापूर्वी मोबाइलमधील सर्व आवश्यक सेटिंग्ज तपासून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वेळ आणि पैशांची बचत -
ई-पीक पाहणीची प्रक्रिया डिजिटल झाल्यामुळे शेतकऱ्यांना पीक नोंदणीसाठी इतरांवर अवलंबून राहण्याची गरज कमी होणार आहे. विशेषतः तंत्रस्नेही शेतकरी आपल्या सोयीनुसार थेट शेतात जाऊन पीक पेरा नोंदवू शकणार आहेत. त्यामुळे सहाय्यकांवरील कामाचा ताण कमी होण्यासोबतच ई-पीक पाहणीचे काम जलदगतीने पूर्ण होण्यास मदत होणार आहे.
पीक नोंदणीची प्रक्रिया अचूकपणे आणि वेळेत पूर्ण झाल्यास शासकीय योजनांचा लाभ, पीकविमा, कृषीविषयक सेवा तसेच महसूल विभागाशी संबंधित विविध कामांसाठी आवश्यक असलेली पीकविषयक माहिती अद्ययावत राहण्यास मदत होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या डिजिटल सुविधेचा अधिकाधिक वापर करून स्वतःच्या शेतातील पीक पेरा नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
ई-पीक पाहणीचे काम जलदगतीने पूर्ण व्हावे, केवळ सहायकांवर भार पडू नये आणि तंत्रस्नेही शेतकऱ्यांना स्वतः पीक पेरा नोंदविता यावा, यासाठी डीसीएस एमएच मोबाइल अॅपवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी या सुविधेचा वापर करून मोबाइल अॅपवरून स्वतः पीक पेरा नोंदवावा सागर कांबळे, तहसीलदार, गडचिरोली.




Petrol Price




