लाखनीत २६ गावांत एक गाव, एक गणपती


- ५४ गणेश मंडळांची नोंदणी; सर्वाधिक ११ मंडळे लाखनी शहरातील
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लाखनी पोलीस स्टेशनच्या हद्दीत गणेश मंडळांची जय्यत तयारी सुरू असून, यंदाचा उत्सव पारंपरिक पद्धतीने, शांततेत आणि सामाजिक सलोखा राखत साजरा करण्यावर मंडळांनी भर दिला आहे. पोलीस स्टेशन अंतर्गत यंदा एकूण ५४ गणेश मंडळांनी नोंदणी केली असून, त्यापैकी २६ गावांत रोषणाई, सजावट तसेच बॅनर-पोस्टर लावण्याचे काम पूर्ण झाले आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते विविध तयारीमध्ये व्यस्त असून, परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
२६ गावांत एक गाव, एक गणपती -
गावातील नागरिकांमध्ये एकोपा वाढावा, विविध गटांतील मतभेद व वादविवाद टाळता यावेत आणि सर्वांनी एकत्रितपणे गणेशोत्सव साजरा करावा, या उद्देशाने एक गाव, एक गणपती उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमामुळे गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक एकता, बंधुभाव आणि सामूहिक सहभागाला चालना मिळणार आहे.
एक गाव, एक गणपती उपक्रमात सावरी, मेंढा/पोहरा, पेंढरी, कनेरी, दगडी, दिघोरी, नान्होरी, शिवनी (मोगरा), सेलोटी, बाम्हणी, मानेगाव (सडक), बोरगाव (राजेगाव), बरडकिन्ही, सामेवाडा, खैरी, सिपेवाडा, चान्ना, राजेगाव (एमआयडीसी), गुंतारा, लाखोरी, खेडेपार, सोमलवाडा, मेंढा, रेंगेपार (कोठा), गोंडसावरी, मोरगाव (राजेगाव), निलागोंदी आणि परसोडी या गावांचा समावेश आहे.
या गावांमध्ये गणेशोत्सव काळात विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार असून, त्यातून नागरिकांना एकतेचा आणि सामाजिक सलोख्याचा संदेश देण्यात येणार आहे. सामूहिकरित्या उत्सव साजरा केल्यामुळे अनावश्यक खर्चाला आळा बसण्याबरोबरच गावातील सर्व घटकांना एकत्र येण्याची संधी मिळणार आहे.
लाखनी शहरात ११ गणेश मंडळे -
लाखनी शहरात यंदा ११ गणेश मंडळांनी नोंदणी केली आहे. शहरातील सिपेवाडा रोड, कुंभार मोहल्ला, निर्वाण मोहल्ला, नगरपंचायत बाजार वार्ड, जुना लाखोरी रोड, लाखोरी रोड पाणीटाकीजवळ, दत्त नगर, सेलोटी रोड, आदर्श नगर आणि संजय नगर या परिसरात गणेशमूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे.
गणेशमूर्ती स्थापनेसह मंडप, विद्युत रोषणाई व सजावटीची कामे पूर्णत्वास आली असून, उत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते आवश्यक नियोजन करीत आहेत. नागरिकांचाही उत्सवाच्या तयारीत उत्स्फूर्त सहभाग दिसून येत आहे.
पोलिसांचा चोख बंदोबस्त -
गणेशोत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी आणि कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी लाखनी पोलिसांकडून विशेष बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. ठाणेदार आशिष गजभिये यांच्या नेतृत्वाखाली पोलिस यंत्रणा सज्ज असून, गणेश मंडळांच्या हालचाली तसेच संवेदनशील ठिकाणांवर पोलिसांचे विशेष लक्ष राहणार आहे.
गणेश मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून शांतता व सुव्यवस्था राखण्यास सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. पारंपरिक पद्धतीने, सामाजिक सलोखा आणि बंधुभाव जपत गणेशोत्सव साजरा करण्यासाठी लाखनी परिसर सज्ज झाला आहे.




Petrol Price




