रिकाम्या रस्त्यावर कार शिकायला जाणे भोवले , वाहून जाणाऱ्या कारमधील दोन युवक बचावले


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
रिकाम्या रस्त्यावर ड्रायव्हिंग शिकण्यासाठी गेलेले दोन युवक आज २१ आॅगस्ट रोजी जलसमाधी मिळता - मिळता बचावले आहेत. वाहून जाणाऱ्या कारमधून दोन्ही युवकांना पोलिस  प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन आणि महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सुरक्षितरित्या काढून जीवनदान दिले आहे.
निखील सत्यनारायण चेरकरी (२७) आणि देवदत्त शरद धारणे (२६) अशी बचावलेल्या दोन्ही युवकांची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार निखील आणि देवदत्त हे दोघे कार शिकण्यासाठी गुरवळा मार्गावर गेले. गडचिरोलीपासून १० किमी अंतरावर गुरवळा गावानजीक रस्त्यावरून पाणी वाहत असताना पाण्यातून त्यांनी कार टाकली. यावेळी रस्त्यावर अचानक काहीतरी आले आणि कार रस्त्याच्या बाजूला उतरली. रस्त्याच्या खाली पाणी अधिक असल्याने कार तरंगू लागली आणि काही कळायच्या आतच कार बंद पडून वाहून जावू लागली. यावेळी अचानक कारसुध्दा लाॅक झाली. यामुळे मागील डिक्कीचे दार खोलून दोघेही बाहेर आहे. एकाने कारच्या टपावर चढून तर एकाने झाडावर चढून आसरा घेतला. या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार डी.एस. भोयर, नायब तहसीलदार किरमे, दुरणकर, मडावी , सहाय्यक पोलिस निरीक्षक उदार, पोलिस उपनिरीक्षक मिसाळ, सहाय्यक फौजदार सहारे, गौरकार, तिम्मलवार आदींनी घटनास्थळी धाव घेतली. ट्युब आणि दोराच्या सहाय्याने दोन्ही युवकांना बाहेर काढले. अशाप्रकारे युवकांना बाहेर काढल्यानंतर सर्वांनीच सुटकेचा श्वास टाकला. कार शिकण्याचा मोह जिवावर बेतला असता आणि मृत्यूच्या दाढेतून बचावण्याचा थरारक अनुभव  अक्षरशः अंगावर शहारे आणणारा ठरला.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-08-21


Related Photos