तुकूमच्या एकता चौकात दहीहंडीचा जल्लोष : गोविंदा पथकांचा उत्स्फूर्त सहभाग


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : तुकूम परिसरातील प्रभाग क्रमांक ५ मधील एकता चौक येथेगोकुळाष्टमीनिमित्त ५ सप्टेंबर रोजी भव्य दहीहंडी उत्सव उत्साहात पार पडला. स्थानिक नगरसेवक अभिषेक डोईफोडे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या उत्सवाला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाला माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार किशोर जोरगेवार, रामनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके, नगरसेवक सचिन कत्याल, नगरसेविका संगीता अमृतकर, नगरसेवक रवी लोनकर, नगरसेविका पुष्पा उराडे, नगरसेविका संजीवनी वासेकर, नगरसेविका सुनंदा धोबे, पसायदान ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रकाश गुंडावार यांच्यासह व्यापारी, डॉक्टर व विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
उत्सवात परिसरातील बालगोपालांसह विविध गोविंदा पथकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. थरावर थर रचत दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. गोविंदांच्या जयघोषाने संपूर्ण एकता चौक परिसर दुमदुमून गेला होता. दहीहंडीचा थरार पाहण्यासाठी शेकडो नागरिकांनी गर्दी केली होती. दरम्यान, आमदार सुधीर मुनगंटीवार व आमदार किशोर जोरगेवार यांनी नगरसेवक अभिषेक डोईफोडे यांच्या सामाजिक कार्यासह प्रभागातील विविध उपक्रमांचे कौतुक केले. दहीहंडी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या बाबुपेठ येथील शितलामाता बालगोपाल मंडळाच्या गोविंदा पथकाला रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
उत्सवादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी रामनगर पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अमन डोईफोडे, विनायक डोईफोडे, मेगा बंडेवार, संजय मासीरकर यांच्यासह वीर साहस बहुउद्देशीय व शैक्षणिक संस्था, चंद्रपूरच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.




Petrol Price




