पाशीवरील रसशोषक किडींचे एकात्मिक व्यवस्थापन करण्याचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : खरीप हंगामातील महत्त्वाचे नगदी पीक असलेल्या कपाशीवर सध्या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव वाढत आहे. अधूनमधून ढगाळ व कोरडे वातावरण तसेच तापमानात झालेली वाढ यामुळे मावा, तुडतुडे, फुलकिडे आणि पांढरी माशी या किडींची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कपाशी पिकाचे नियमित निरीक्षण करून एकात्मिक पद्धतीने किडींचे व्यवस्थापन करण्याचे आवाहन कृषि विज्ञान केंद्राच्यावतीने करण्यात आले आहे. मावा पिवळसर किंवा फिक्कट हिरव्या रंगाचा असून तो कोवळ्या डहाळ्यांवर व पानांच्या खालच्या बाजूस समूहाने राहून रस शोषतो. प्रादुर्भाव वाढल्यास पाने कोकडतात व झाडाची वाढ खुंटते. तुडतुडे फिक्कट हिरव्या रंगाचे असून ते पानांच्या खालच्या बाजूने रस शोषतात. त्यामुळे पानांच्या कडा प्रथम पिवळ्या व नंतर तपकिरी होतात. फुलकिड्यांमुळे पानांवर पांढुरके चट्टे व तपकिरी ठिपके दिसतात. पांढरी माशीही पानांच्या खालच्या बाजूस राहून रस शोषते. तीव्र प्रादुर्भावात पाने लालसर होऊन वाळतात.
सरासरी १० मावा किटक प्रति पान किंवा १५ ते २० टक्के प्रादुर्भावग्रस्त झाडे, २ ते ३ तुडतुडे प्रति पान, १० फुलकिडे प्रति पान, तसेच ८ ते १० प्रौढ पांढऱ्या माश्या किंवा २० पिल्ले प्रति पान आढळल्यास व्यवस्थापनाची आवश्यकता आहे. मावा, तुडतुडे व फुलकिडे मिळून सरासरी १० किडी प्रति पान आढळल्यासही उपाययोजना करावी.
शेतकऱ्यांनी शिफारशीपेक्षा अधिक नत्र खताचा वापर टाळावा तसेच पिवळे व निळे चिकट सापळे शेतात लावावेत. सिरफिड माशी, कातीन, ढालकिडे, क्रायसोपा यांसारखे मित्रकीटक पुरेशा प्रमाणात आढळल्यास रासायनिक कीटकनाशकांचा वापर टाळावा. सुरुवातीच्या प्रादुर्भावासाठी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा अझॅडीरेक्टिन ३०० पीपीएम निमतेल बेस डब्ल्यू.एस.पी.५० मिली किंवा अझॅडीरेक्टिन ५ टक्के ५ मिली किंवा व्हार्टिसिलियम लॅकेनी ५० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
वरील उपायांनंतरही किडींनी आर्थिक नुकसानीची पातळी गाठल्यास कृषी विभागाच्या शिफारशीनुसार नोंदणीकृत कीटकनाशकांपैकी योग्य एका कीटकनाशकाची फवारणी करावी. दुसरी फवारणी करताना कीटकनाशकाचा गट बदलावा. फवारणीपूर्वी उत्पादनाच्या लेबलवरील सूचना, प्रमाण व सुरक्षितता नियमांचे काटेकोर पालन करावे, असे कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जीवन कतोरे यांनी कळविले आहे.




Petrol Price




