एकोरी वॉर्डात पाणीपुरवठा, स्वच्छतेचा प्रश्न गंभीर : युवासेनेचे मनपा आयुक्तांना निवेदन


- तातडीने नळ दुरुस्ती व नियमित स्वच्छतेची मागणी; कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशारा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १० मधील एकोरी वॉर्डातील सुमारे ३०० घरांच्या वस्तीत पाणीपुरवठा आणि स्वच्छतेच्या गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. या समस्यांची तातडीने दखल घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी युवासेनेच्या वतीने महानगरपालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे आणि महानगरप्रमुख तथा माजी नगरसेवक सुरेश पचारे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले.
एकोरी वॉर्डातील शासकीय नळ तुटलेल्या अवस्थेत असल्याने नागरिकांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी दूरवर असलेल्या हातपंपावर जावे लागत आहे. त्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुलांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय परिसरात नियमित साफसफाई होत नसल्याने ठिकठिकाणी कचरा साचून अस्वच्छता निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, मनपा प्रशासनाने तातडीने परिसराची स्वच्छता करून नियमित साफसफाईची व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली.
नळ दुरुस्त करून पाणीपुरवठा सुरळीत करावा, तसेच परिसरात नियमित स्वच्छता करावी, अशी मागणी युवासेनेने केली. नागरिकांना पिण्याचे पाणी आणि स्वच्छ परिसर मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क असून प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहावे, असेही निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, मागण्यांवर तातडीने कार्यवाही न झाल्यास नागरिकांच्या न्याय्य हक्कांसाठी युवासेनेच्या वतीने महानगरपालिका प्रशासनाविरोधात लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
यावेळी चंद्रपूर तालुकाप्रमुख सागर गभणे, शहरप्रमुख सय्यद फरदीन, तालुका समन्वयक पवन उडाके, विवान रामटेके, आरिश शेख, सय्यद आकिब, रझा सिद्दीकी, सलमान शेख, फरहान शेख, जाहिद शेख, काशिफ शेख, शाहजान शेख, रोशन खोब्रागडे, धम्मदीप खोब्रागडे, रितिक रायपुरे, मंगेश रायपुरे यांच्यासह मोठ्या संख्येने युवासैनिक उपस्थित होते.




Petrol Price




