शेतीचा व्यवहार करून अडीच लाख घेतले : दुसऱ्यालाच विकली जमीन


- सिरोली येथील प्रकरण; दाम्पत्याविरुद्ध पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया : शेती विक्रीचा करार करून संबंधित खरेदीदाराकडून अडीच लाख रुपये स्वीकारल्यानंतर त्याला कोणतीही पूर्वकल्पना न देता त्याच शेतजमिनीचा व्यवहार अन्य व्यक्तीसोबत केल्याचा प्रकार अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील सिरोली येथे उघडकीस आला आहे. तसेच पहिल्या व्यवहारापोटी स्वीकारलेली रक्कमही परत न केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी अर्जुनी-मोरगाव पोलिसांनी दाम्पत्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पवन यमुदेव म्हस्के ४३ वर्ष रा. सिरोली यांच्यासोबत आरोपी जगदीश शिवकुमारसिंग पवार ५७ वर्ष आणि ममता जगदीश पवार ४५ वर्ष दोघे रा. सिरोली यांनी सिरोली येथील शेतशिवारातील गट क्रमांक २६५/४ मधील ०.२० हेक्टर आर शेती विक्री करण्याचा करार केला होता.
या शेतजमिनीची एकूण किंमत ४ लाख रुपये ठरविण्यात आली होती. करारनाम्याच्या वेळी पवन म्हस्के यांच्याकडून आरोपींनी एक लाख ५० हजार रुपये रोख आणि एक लाख रुपयांचा धनादेश, अशी एकूण २ लाख ५० हजार रुपयांची रक्कम स्वीकारली. उर्वरित एक लाख ५० हजार रुपये रजिस्ट्रीच्या वेळी देण्याचे ठरले होते.
तक्रारीनुसार, १७ ऑक्टोबर २०२५ ते २८ जानेवारी २०२६ या कालावधीत हा व्यवहार झाला. मात्र, त्यानंतर आरोपींनी पवन म्हस्के यांना कोणतीही पूर्वकल्पना दिली नाही. त्याच शेतजमिनीचा व्यवहार त्यांनी अन्य व्यक्तीसोबत केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.आरोपींनी सिरोली येथील त्याच शेतजमिनीचा व्यवहार नितीन निलयचंद पुगलिया (रा. नवेगावबांध) यांच्यासोबत परस्पर केल्याचा आरोप आहे. त्यामुळे पवन म्हस्के यांच्याकडून स्वीकारलेली अडीच लाख रुपयांची रक्कमही परत करण्यात आली नाही. यामुळे आपली आर्थिक फसवणूक झाल्याची तक्रार पवन म्हस्के यांनी अर्जुनी-मोरगाव पोलिस ठाण्यात दाखल केली.
तक्रारीच्या आधारे अर्जुनी-मोरगाव पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४) आणि ३ (५) अन्वये जगदीश पवार व ममता पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक रोहनकर करीत आहेत.
व्यवहाराच्या कागदपत्रांची तपासणी -
या प्रकरणात पोलिसांकडून शेती विक्रीचा करारनामा, रक्कम स्वीकारल्याचे पुरावे, धनादेश तसेच त्यानंतर करण्यात आलेल्या व्यवहाराशी संबंधित कागदपत्रांची तपासणी केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे तपासाअंती या व्यवहारातील नेमकी वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.




Petrol Price




