दहा दिवस धुमाकूळ घातल्यानंतर रानटी हत्तींचा कळप पुन्हा जंगलात


- चुरचुरा-दिभना परिसरातील धान पिकांचे नुकसान; सूर्यडोंगरी-इंजेवारी-सिर्सी जंगलात हत्तींचा वावर
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : गेल्या तब्बल दहा दिवसांपासून चुरचुरा-दिभना परिसरातील शेतशिवारात धुमाकूळ घालून धान पिकांची नासधूस करणाऱ्या रानटी हत्तींच्या कळपाने अखेर पुन्हा जंगलाचा मार्ग धरला आहे. शुक्रवारी रात्री हा हत्तींचा कळप सूर्यडोंगरीच्या जंगलात दाखल झाल्याची माहिती आहे. सध्या हत्तींचा कळप सूर्यडोंगरी-इंजेवारी-सिर्सी परिसरातील जंगलात असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे.
गेल्या दहा दिवसांपासून रानटी हत्तींच्या कळपाने चुरचुरा-दिभना परिसरातील शेतशिवारात ठाण मांडले होते. रात्रीच्या वेळी शेतांमध्ये प्रवेश करून हत्तींनी उभ्या धान पिकांची नासधूस केली. हत्तींच्या या वावरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, ऐन हंगामात उभ्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
रात्रीच्या वेळी हत्तींचा वावर -
रानटी हत्ती प्रामुख्याने रात्रीच्या वेळी शेतशिवारात दाखल होत असल्याने शेतकऱ्यांना आपल्या पिकांच्या संरक्षणासाठी मोठी कसरत करावी लागत होती. हत्तींचा कळप शेत परिसरात असल्याची माहिती मिळताच ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत होते. त्यामुळे अनेक शेतकरी रात्रीच्या वेळी शेताकडे जाणे टाळत असल्याचे चित्र होते.
दरम्यान, शुक्रवारी रात्री हत्तींचा कळप चुरचुरा-दिभना परिसरातून पुढे सरकत सूर्यडोंगरीच्या जंगलात दाखल झाला. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी काहीसा सुटकेचा निश्वास सोडला असला, तरी हत्तींचा कळप पुन्हा शेतशिवाराकडे वळण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने त्यांची चिंता कायम आहे.
सूर्यडोंगरी-इंजेवारी-सिर्सी परिसरात वावर -
सध्या हत्तींचा कळप सूर्यडोंगरी, इंजेवारी आणि सिर्सी या परिसरातील जंगलात असल्याची माहिती मिळत आहे. जंगलालगतच्या शेतांमध्ये हत्तींचा वावर होण्याची शक्यता असल्याने या परिसरातील शेतकऱ्यांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. हत्तींच्या हालचालींवर वनविभागाने लक्ष ठेवावे आणि त्यांचा कळप कोणत्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे, याबाबत संबंधित गावांतील नागरिकांना वेळोवेळी माहिती द्यावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
पिकांच्या नुकसानीची भरपाई मिळण्याची अपेक्षा -
रानटी हत्तींच्या कळपाने धान पिकांचे नुकसान केल्याने बाधित शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे वनविभागाने नुकसानीची पाहणी करून पंचनामे करावेत आणि शासनाच्या नियमानुसार शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी होत आहे. हत्तींचा कळप सध्या जंगलात परतल्याने चुरचुरा-दिभना परिसरातील शेतकऱ्यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. मात्र, जंगल परिसरात त्यांचा वावर सुरू असल्याने पुढील काही दिवस शेतकऱ्यांना विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे. वनविभागाच्या सतर्कतेमुळे हत्ती आणि मानव यांच्यातील संघर्ष टाळण्यास मदत होऊ शकते.




Petrol Price




