महत्वाच्या बातम्या

 जपतलाई दुर्घटनेनंतर प्रशासनाची धावपळ : चामोर्शी तालुक्यात शाळा, अंगणवाड्यांची विशेष स्वच्छता मोहीम


- सर्पदंशाच्या दुर्घटनेनंतर गटविकास अधिकाऱ्यांचे निर्देश , गवत, झुडपे, कचरा हटवून परिसर निर्जंतुक करण्यावर भर

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : काही दिवसांपूर्वी जपतलाई येथील आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन चिमुकल्या मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या हृदयद्रावक घटनेनंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. भविष्यात अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी चामोर्शी तालुक्यातील सर्व शाळा आणि अंगणवाडी परिसराची विशेष स्वच्छता मोहीम राबविण्याचे निर्देश पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी दिले आहेत.

तालुक्यातील शाळा व अंगणवाडी परिसरात वाढलेले गवत, झुडपे, काडी-कचरा, पडीक वस्तू तसेच जुन्या व पडझड झालेल्या इमारतींचे अवशेष यामुळे साप, विंचू आणि इतर विषारी जीवजंतूंचा धोका निर्माण होण्याची शक्यता असते.

त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आणि लहान बालकांच्या आरोग्य व सुरक्षिततेचा प्रश्न गांभीर्याने घेत प्रशासनाने तातडीने स्वच्छता करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ग्रामपंचायतींच्या माध्यमातून संबंधित शाळा व अंगणवाडी परिसराची संपूर्ण साफसफाई करून वाढलेले गवत, झुडपे आणि काडी-कचरा हटविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच परिसरात पडून असलेल्या निरुपयोगी वस्तू आणि धोकादायक अवशेषांची विल्हेवाट लावण्यावरही भर देण्यात आला आहे.

साचलेल्या पाण्यामुळे आजारांचा धोका -

पावसाळ्याच्या काळात शाळा व अंगणवाडी परिसरात अनेक ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता असते. या साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होऊन मलेरिया, डेंग्यू यांसारख्या आजारांचा धोका वाढू शकतो. त्यामुळे परिसरातील साचलेले पाणी तातडीने हटवून डास प्रतिबंधक उपाययोजना करण्याचे निर्देशही गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी दिले आहेत. शाळा व अंगणवाडी परिसराची स्वच्छता करून आवश्यकतेनुसार निर्जंतुकीकरणाची कार्यवाही करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. यामुळे विषारी जीवजंतूंचा धोका कमी होण्यासोबतच विद्यार्थ्यांसाठी स्वच्छ आणि सुरक्षित वातावरण उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

अंगणवाडी सेविकांनाही सूचना -

अंगणवाडी परिसरातील स्वच्छतेला प्राधान्य देऊन मोहीम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना अंगणवाडी सेविकांना देण्यात आल्या आहेत. परिसरात कोणत्याही प्रकारचा धोका आढळल्यास त्याची तातडीने माहिती संबंधित यंत्रणेला देण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. जपतलाई येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घेतलेल्या या उपाययोजनेमुळे तालुक्यातील शाळा आणि अंगणवाडी परिसर अधिक सुरक्षित होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी केवळ मोहीम राबविण्याऐवजी नियमित स्वच्छता आणि परिसराची सातत्याने देखभाल करण्याची गरज असल्याचेही नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.





  Print






Related Photos