महत्वाच्या बातम्या

 आश्रमशाळांमध्ये १,००२ सहायक अधीक्षकांची भरती प्रस्तावित


- विद्यार्थ्यांची सुरक्षा, आरोग्य व स्वच्छतेवर २४ तास देखरेख; दरमहा ३६ हजार मानधनाचा प्रस्ताव

विदर्भ न्यूज एक्सप्रेस  
प्रतिनिधी / गडचिरोली : राज्यातील शासकीय आश्रमशाळांमध्ये निवासी विद्यार्थ्यांची सुरक्षा, आरोग्य, स्वच्छता आणि दैनंदिन व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी प्रत्येक आश्रमशाळेत सहायक अधीक्षक आणि सहायक अधीक्षिका नियुक्त करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आदिवासी विकास आयुक्तालयाने राज्यातील ५०१ शासकीय आश्रमशाळांसाठी ५०१ सहायक अधीक्षक आणि ५०१ सहायक अधीक्षिका, अशी एकूण १,००२ अतिरिक्त पदे निर्माण करून ती बाह्यस्रोताद्वारे भरण्यास शासनाने परवानगी द्यावी, अशी शिफारस आदिवासी विकास विभागाच्या सचिवांकडे केली आहे.

आदिवासी विकास आयुक्त लीना बनसोड यांनी २९ जुलै २०२६ रोजी यासंदर्भातील प्रस्ताव आदिवासी विकास विभागाच्या सचिवांकडे सादर केला आहे. त्यामुळे या प्रस्तावावर शासनस्तरावर पुढील कार्यवाही सुरू झाली आहे. प्रस्तावात राज्यात एकूण ५०० शासकीय आश्रमशाळा कार्यरत असल्याचा उल्लेख आहे. दरम्यान, ५०१ आश्रमशाळांसाठी पदांची मागणी करण्यात आल्याने प्रस्तावातील आकडेवारीकडेही लक्ष वेधले जात आहे.

सर्पदंशाच्या घटनेनंतर सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर -
धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील अनुदानित आश्रमशाळेत घडलेल्या सर्पदंशाच्या दुर्दैवी घटनेनंतर निवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आश्रमशाळांमध्ये विद्यार्थी मोठ्या संख्येने निवासी असल्याने त्यांच्यावर दिवसरात्र लक्ष ठेवण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ असणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर सहायक अधीक्षक व सहायक अधीक्षिकांची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव महत्त्वाचा मानला जात आहे.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसोबतच त्यांच्या आरोग्याची काळजी, स्वच्छता, भोजन, वसतिगृहातील व्यवस्था आणि आपत्कालीन परिस्थितीत तातडीने उपाययोजना करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचे विभागाने अधोरेखित केले आहे.

२४ तास देखरेखीचे मोठे आव्हान -
शासकीय आश्रमशाळा निवासी स्वरूपाच्या असल्याने विद्यार्थ्यांना २४ तास निवास, भोजन, आरोग्य, सुरक्षा, शिक्षण आणि समुपदेशनाच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या दैनंदिन गरजांबरोबरच रात्रीच्या वेळी देखरेख ठेवणे, अचानक उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाणे, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची खात्री करणे आणि शिस्तीचे पालन करून घेणे ही जबाबदारी अधीक्षकांवर असते.

मोठ्या संख्येने विद्यार्थी निवासी असलेल्या आश्रमशाळांमध्ये एकाच अधीक्षकाला या सर्व जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडणे कठीण होत असल्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे अधीक्षकांना सहाय्य करण्यासाठी स्वतंत्र सहायक अधीक्षक व सहायक अधीक्षिका उपलब्ध करून देण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली आहे.

दरमहा ३६ हजार रुपये मानधन -
प्रस्तावित सहायक अधीक्षक आणि सहायक अधीक्षिका या दोन्ही पदांसाठी दरमहा ३६ हजार रुपये मानधन देण्याचा प्रस्ताव आहे. त्यानुसार १,००२ पदांसाठी दरमहा सुमारे ३ कोटी ६० लाख ७२ हजार रुपये, तर वर्षाला सुमारे ३९ कोटी ६७ लाख ९२ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे या पदांच्या नियुक्तीसाठी शासनाला त्यानुसार आर्थिक तरतूद करावी लागणार आहे.आरोग्य व स्वच्छतेवरही राहणार विशेष लक्ष आश्रमशाळांमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी एकत्र निवासी असल्याने आजारी विद्यार्थ्यांची वेळेवर देखभाल करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

एखाद्या विद्यार्थ्याची प्रकृती अचानक बिघडल्यास त्याला तातडीने वैद्यकीय मदत मिळवून देणे, त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवणे आणि आवश्यकतेनुसार रुग्णालयात दाखल करणे, यासाठी जबाबदार मनुष्यबळ आवश्यक आहे.याशिवाय स्नानगृहे, शौचालये, वसतिगृह परिसर आणि इतर निवासी सुविधांच्या नियमित स्वच्छतेवर देखरेख ठेवणेही गरजेचे आहे. या संदर्भात वेळोवेळी तक्रारी प्राप्त होत असल्याने सहायक अधीक्षकांच्या नियुक्तीमुळे व्यवस्थेवर अधिक प्रभावी नियंत्रण ठेवता येईल, असा विभागाचा दावा आहे.

२४ तास आश्रमशाळेत उपस्थिती बंधनकारक -
प्रस्तावित पदांसाठी समाजकार्य विषयातील बीएसडब्ल्यू किंवा एमएसडब्ल्यू ही शैक्षणिक पात्रता प्रस्तावित करण्यात आली आहे. हे पद निवासी स्वरूपाचे राहणार असून नियुक्त कर्मचाऱ्यांना आश्रमशाळेत राहूनच कर्तव्य बजावावे लागणार आहे.विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गरजेनुसार रात्री तसेच सुट्टीच्या दिवशीही ड्युटी बजावण्याची जबाबदारी संबंधित कर्मचाऱ्यांवर राहणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना २४ तास आवश्यक देखरेख उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

अधीक्षकांवरील कामाचा ताण होणार कमी -
सुधारित आकृतीबंधानुसार शासकीय आश्रमशाळांमध्ये नियमित अधीक्षक व अधीक्षिका पदांना मान्यता आहे. मात्र, विद्यार्थ्यांची संख्या मोठी असलेल्या आश्रमशाळांमध्ये एका अधीक्षकावर येणारा कामाचा ताण मोठ्या प्रमाणात आहे. प्रशासकीय कामकाजासोबतच विद्यार्थ्यांची निवासी व्यवस्था, आरोग्य, सुरक्षा आणि शिस्त या सर्व बाबींकडे लक्ष देताना अडचणी निर्माण होतात.

सहायक अधीक्षक आणि सहायक अधीक्षिका नियुक्त झाल्यास अधीक्षकांना दैनंदिन व्यवस्थापनात मोठी मदत मिळेल. परिणामी विद्यार्थ्यांवर अधिक बारकाईने लक्ष ठेवणे आणि उद्भवणाऱ्या समस्यांवर तातडीने कार्यवाही करणे शक्य होईल.

विद्यार्थी संख्येनुसार अतिरिक्त मनुष्यबळाची तरतूद -
विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेऊन अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची तरतूद आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळा संहिता २०१२ मध्ये असल्याचे आयुक्तालयाने प्रस्तावात स्पष्ट केले आहे. त्याच अनुषंगाने सहायक अधीक्षक व सहायक अधीक्षिका ही पदे भरण्याचा प्रस्ताव पुढे करण्यात आला आहे.

शासनाने या प्रस्तावाला मंजुरी दिल्यास राज्यातील शासकीय आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षा, आरोग्य, स्वच्छता आणि निवासी व्यवस्थेला अधिक बळकटी मिळण्याची अपेक्षा आहे. विशेषत रात्रीच्या वेळी स्वतंत्र मनुष्यबळ उपलब्ध झाल्याने निवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे.





  Print






Related Photos