केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची हर्षवर्धन बाबा आत्राम व डॉ. मिताली आत्राम यांच्याशी भेट


- अहेरीतील राष्ट्रीय महामार्गाच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी : अहेरी विधानसभा क्षेत्राच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या राष्ट्रीय महामार्गांच्या प्रलंबित प्रश्नांना गती मिळावी, यासाठी श्री. हर्षवर्धन बाबा आत्राम व डॉ. मिताली आत्राम यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची नागपूर येथील महाल परिसरात भेट घेतली.आमदार डॉ.धर्मराव बाबा आत्राम यांच्या आदेशानुसार झालेल्या या भेटीत अहेरी विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रीय महामार्गाशी संबंधित विविध प्रलंबित कामांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी आलापल्ली–सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाचा प्रलंबित प्रकल्प विशेषत्वाने मांडण्यात आला. मागील अनेक वर्षांपासून या मार्गाचे काम रखडले असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या महत्त्वपूर्ण मार्गाचे काम तातडीने मार्गी लावण्याची मागणी हर्षवर्धन बाबा आत्राम व डॉ. मिताली आत्राम यांनी नितीन गडकरी यांच्याकडे केली.
तसेच आलापल्ली–सिरोंचा मार्गाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या मार्गाला भेट द्यावी, अशी विनंतीही यावेळी करण्यात आली. अहेरी विधानसभा क्षेत्रातील जनतेच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग असून, त्याचे काम पूर्ण होणे ही परिसराची प्रमुख गरज असल्याचे यावेळी निदर्शनास आणून देण्यात आले.
या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देताना नितीन गडकरी यांनी संबंधित कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले, अशी माहिती हर्षवर्धन बाबा आत्राम व डॉ. मिताली आत्राम यांनी दिली. या भेटीमुळे अहेरी विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रीय महामार्गाच्या प्रलंबित प्रश्नांना गती मिळण्याची अपेक्षा असून, आलापल्ली–सिरोंचा मार्गाच्या कामाबाबत नागरिकांच्या आशा पुन्हा उंचावल्या आहेत.




Petrol Price




