कोंढाळा येथील 'त्या' कुटुंबाला कधी मिळणार घरकुल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / कोंढाळा (देसाईगंज) :
शासनाच्या योजनांचा अनेक ठिकाणी बोजवारा उडाला आहे.   शासकीय यंत्रणेच्या अनियंत्रित कारभाराने मात्र खरे लाभार्थी वंचित राहतात. योजनांमध्ये करोडो रुपयांचा भ्रष्टाचार होतो, यातही गरिबाला देणे - घेणे नाही. मात्र जे त्यांच्या वाट्याचे आहे ते तरी त्यांना इमाने इतबारे द्यावे असेही या यंत्रणेला वाटत नसावे. यामुळेच आज हजारो कुटुंब उघड्यावर जीवन जगत आहेत. असेच उघड्यावर जीवन जगणारा आणि मोलमजुरी करून तीन मुलींचा सांभाळ करताना कसरत करणारा कोंढाळा येथील नामदेव  राजीराम भोयर हा घरकुल मिळण्याची वाट बघत आहे. 
सुरुवातीच्या काळात माणसाच्या सीमित अश्या मूलभूत गरजा होत्या. जसे, अन्न ,वस्त्र व निवारा . या मूलभूत गरजा जीवन जगण्यासाठी आवश्यक मानल्या जायच्या. मात्र   दिवसेंदिवस मानवांच्या गरजा वाढत चालल्या. जसे, वरील तीन गरजां व्यतिरिक्त आणखी दोन गरजा म्हणजे शिक्षण व आरोग्य या सुद्धा मूलभूत गरजा जीवनावश्यक झालेल्या आहेत. आजची स्थिती   बघता वेगळाच प्रकार  पाहावयास मिळतो. ज्या गरजू व्यक्तींना घरकुलाची आवश्यकता आहे. अशा व्यक्तींना घरकुल तर सोडा,साधी नुकसान भरपाई सुद्धा मिळत नाही. अशाच प्रकारचे कोंढाळा येथील   नामदेव  राजीराम भोयर  याचे कुटुंब उघड्यावरच जीवन जगत आहे. हा व्यक्ती अपंग  आहे. परंतु यांस कुठलेही लाभ मिळत नाही. पत्नी मरण पावलेली आहे.  तीन  मुली आहेत. मोठी मुलगी इयत्ता नववीमध्ये, दुसरी मुलगी इयत्ता पाचवीमध्ये व लहान मुलगी  अंगणवाडी मध्ये आहे. नामदेव कसा-बसा गावातील गाई-ढोरे राखून आपला संसाराचा  गाडा चालवीत आहे. मोडकडीस आलेल्या घराला  केवळ पाल बांधून आपले दारिद्य्रातील  जीवन जगत आहे. मात्र याकडे कुणाचेही लक्ष नाही. केवळ नामधारी पाहणी करून पोकळ आश्वासने पदाधिकारी व कर्मचारी देतात,  असे नामदेव  यांचे म्हणणे आहे. घरकुलाची  नुकसान भरपाई, अपंगाचे लाभ व घरकुलाचा  लाभ  लवकरात लवकर मिळावा असे नामदेव म्हणतो.   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-08-19


Related Photos