'प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे' : प्रल्हाद कुरतडकर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
मनोरंजन प्रतिनिधी / मुंबई : 
‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका पुन्हा एकदा झी मराठी वाहिनीवर १४ जानेवारी पासून रात्री १०.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेतील 'ता इसरलंय..' हा संवाद आणि तो संवाद बोलणारा पांडू अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या संवादामुळे घराघरांमध्ये पोहोचलेला लेखक अभिनेता प्रल्हाद कुरतडकर हा 'रात्रीस खेळ चाले'च्या दुसऱ्या भागातून देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या निमित्ताने प्रल्हाद सोबत साधलेला हा खास संवाद.
१. रात्रीस खेळ चाले या मालिकेने प्रेक्षकांना शेवटच्या भागापर्यंत खिळवून ठेवलं होतं, आता येणाऱ्या दुसऱ्या भागाबद्दल काय सांगाल?  रात्रीस खेळ चाले च्या पहिल्या भागावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं त्यामुळे लोकांना आवडणारी पात्रं, भीती, मजा ही असणारच आहे. पहिला भाग जिथे संपला तिथूनच पुढचा भाग होणार नसून पुढे काय असणार आहे याची उत्सुकता आम्ही कायम ठेवली आहे. पण प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे.

२. या भागाचं लेखन कोणी केलं आहे?

- लतिका सावंत आणि राजू घाग यांनी माझ्यासोबत ही कथा लिहिली आहे. मी पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. तर राजू सावंत यांनी या मालिकेच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 

३. आधीच्या भागाला इतका उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर दुसरा भाग करताना किती उत्सुकता आहे?
-  दुसरा भाग म्हणजे उत्सुकता द्विगुणित झाली आहे आणि तितकीच जबाबदारीदेखील वाढलेली आहे. पण आमची संपूर्ण टीम ही जबाबदारी पेलण्यास सज्ज झाली आहे.
४. दुसऱ्या भागाची अधिकृत घोषणा केल्यानंतर प्रेक्षकांकडून काय प्रतिक्रिया मिळाली?

- या मालिकेची कथा इतकी सस्पेन्स आहे कि आता त्याचा दुसरा भाग येतोय म्हटल्यावर प्रेक्षक स्वतःच त्यांना वाटेल त्या बाजूने कथेचा विचार करायला लागले आहेत. ते स्वतः कथा तयार करत आहेत.
५. या भागात देखील तेच कलाकार आणि तोच वाडा पाहायला मिळणार का?
- हो आम्ही पुन्हा त्याच नाईकांच्याच वाड्यावरच चित्रीकरण करत आहोत. तसेच आधीच्या भागातील सगळ्या व्यक्तिरेखा या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार असून काही नव्या पात्रांचा देखील या कथेत सहभाग असणार आहे.  Print


News - Rajy | Posted : 2019-01-08


Related Photos