सोयरीक जुळविण्यासोबतच रंगू लागल्या राजकारणाच्या चर्चा !


- ग्रामीण भागात पिक पाण्यासोबतच राजकारणालाही दिले जातेय महत्व
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
पूर्वीच्या काळात लग्न जुळविण्यासाठी गेलेली पाहुणे मंडळी ख्याली खुशाली आणि पिक पाण्याच्या चर्चांवर भर देत होते. तसेच दूरदूरचे नाते काढून त्यावर अवांतर चर्चा करताना दिसून येत होते. मात्र सध्यास्थितीत सोयरीक जुळविण्यासाठी गेलेली मंडळी आगामी २०१९ च्या निवडणूकीच्या चर्चा रंगवितांना दिसून येत आहेत. 
सध्या देशभरात आगामी निवडणूकीचे वारे वाहू लागले आहेत. राजकीय पक्ष वेगवेगळे मुद्दे समोर करून पक्षाला समोर आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. आरोप - प्रत्यारोप, घोटाळ्यांवर चर्चा, राममंदिराचा मुद्दा अशा विविध विषयांवरून देशभरात रणकंदन सुरू आहे. अशातच सध्या लग्न जुळविण्याच्या हालचाली सुरू आहेत. मुलीकडील मंडळी मुलाकडे मुलाकडील मंडळी मुलीकडे गेल्यानंतर काही वेळ चर्चांचे आदान - प्रदान केले जाते. मात्र यावर्षी राजकारणाच्या चर्चा अधिक असल्याचे दिसून येत आहे. कोणता पक्ष कोणता उमेदवार उभा करेल, कोणत्या उमेदवाराला कोणत्या पक्षाची तिकीट मिळणार, विद्यमान लोकप्रतिनिधींची  कामगिरी कशी, येत्या काळात कोणत्या प्रकारे निवडणूकीला सामोरे जाईल, कोणता उमेदवार किती पैसा उधळणार, कोण कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढविणार, मतदारांचा कल कोणाकडे असणार अशा विविध विषयांवर चर्चा रंगू लागल्या आहेत. यामुळे निवडणूकीची उत्सुकता शिगेला गेल्याचेच दिसून येत आहे. 
२०१४ मध्ये पार पडलेल्या निवडणूकीत भाजपाने मोठे यश मिळविले. यानंतर घेतलेले निर्णय, नोटबंदी, काळा पैसा, भ्रष्टाचार, आश्वासने, शेतकऱ्यांचे प्रश्न, महागाई, जिएसटी, आंदोलने, आरक्षणाचे मुद्दे  अशा विविध प्रश्नांवर चर्चा करून हे निर्णय कोणासाठी किती फायदेशिर आणि नुकसानदायक ठरू शकतात, याचेही चित्र रंगविले जावू लागले आहेत. अनेकदा बाहेर जिल्ह्यात वा बाहेर राज्यातसुध्दा मुली किंवा मुलाकडील मंडळी सोयरीक जुळविण्यासाठी जातात. याप्रसंगीही तुमच्याकडील वातावरण कसे, आमच्याकडील कसे यावरही चर्चा रंगू लागतात. सध्या काही राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणूकांमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील याचेही गणित जुळविले जात आहे. एकंदरीत सोयरीक जुळविण्यासाठी गेल्यानंतर पावण्या मंडळींना चर्चेसाठी विषय महत्वाचा मिळाला, असे म्हणायला हरकत नाही.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-11-24


Related Photos