महत्वाच्या बातम्या

 महाडीबीटी १.० पोर्टलवरील प्रलंबित अर्ज १५ सप्टेंबरपर्यंत निकाली काढा


- विद्यार्थी, पालक आणि महाविद्यालयांनी मुदतीत कार्यवाही करण्याचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४, २०२४-२०२५ आणि २०२५-२०२६ मधील प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी महाडीबीटी १.० पोर्टल १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत सक्रिय राहणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संस्थांचे प्राचार्य, विद्यार्थी आणि पालकांनी पोर्टलवरील प्रलंबित अर्जांबाबतची आवश्यक कार्यवाही विहित मुदतीत पूर्ण करावी, असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण यांनी केले आहे.

महाडीबीटी १.० पोर्टलवरील महाविद्यालयांच्या लॉग-इनमध्ये प्रलंबित असलेल्या अर्जांमध्ये विद्यार्थी स्तरावरील त्रुटींची दुरुस्ती करून संबंधित अर्ज पुनःप्रक्रियेसाठी पाठविणे आवश्यक आहे. तसेच महाविद्यालयीन स्तरावर अर्ज प्रलंबित असल्यास संबंधित महाविद्यालयांनी आवश्यक पडताळणी व कार्यवाही पूर्ण करून अर्ज पुढील प्रक्रियेसाठी सादर करावेत.

विद्यार्थी स्तरावर अर्ज प्रलंबित असल्यास संबंधित विद्यार्थी व पालकांनी अर्जातील त्रुटींची तातडीने पूर्तता करून १५ सप्टेंबरपूर्वी अर्ज सादर करावा. विहित मुदतीत अर्ज सादर न केल्यामुळे अर्ज प्रलंबित राहिल्यास त्याची जबाबदारी संबंधित विद्यार्थी व पालकांची राहील. यासाठी समाज कल्याण विभाग जबाबदार राहणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, शैक्षणिक वर्ष २०२६-२०२७ साठी नवीन अर्ज तसेच नवीन अर्जदारांची नोंदणी महाडीबीटी २.० पोर्टलवर स्वीकारण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पोर्टलवरील आपली वैयक्तिक व शैक्षणिक माहिती तसेच प्रोफाइल नियमितपणे अद्ययावत ठेवावे.

महाडीबीटी १.० पोर्टलवरील जुन्या शैक्षणिक वर्षांचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी उपलब्ध असलेल्या या अंतिम मुदतीचा लाभ घेऊन विद्यार्थी, पालक आणि संबंधित महाविद्यालयांनी आवश्यक कार्यवाही १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करावी, असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण यांनी केले आहे.





  Print






Related Photos