बीड नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांसह ६ जणांचे निलंबन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / बीड :
शहरातील नगर पालिकेतील मुख्याधिकाऱ्यांसह सहा अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. कर्तव्यात कसूर करणे, नगरपालिकेतील अनियमिततेचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
मुख्याधिकारी डॉ. उत्कर्ष गुट्टे, जिल्हा प्रशासन अधिकारी नीता अंधारे, पाणी पुरवठा अभियंता राहुल टाकळे, बांधकाम अभियंता योगेश हाडे, कर अधीक्षक सुधीर जाधव, कनिष्ठ रचना सहायक सलीम ट्रेसर, अशी निलंबित करण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
विधीमंडळात शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी केलेल्या लक्षवेधी सूचनेवर चर्चा झाली. या चर्चेत शशिकांत शिंदे, सतीश चव्हाण व इतर सदस्यांनी सहभाग घेतला. नगरपालिका अंतर्गत नागरिकांना सुविधा मिळत नाहीत. अधिकारी व कर्मचारी हे कर्तव्यात कसूर करतात, त्याचबरोबर लोकप्रतिनिधींनी बोलावलेल्या बैठकांना गैरहजर राहतात, असा आरोप मेटे यांनी केला आहे. यावर राज्याचे नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी 6 अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची घोषणा केली आहे.
दरम्यान नगरपालिका अंतर्गत गैरकारभाराच्या चौकशीसाठी समिती गठीत करण्यात येईल, अशी घोषणा मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केली आहे. या कारवाईने प्रशासनात खळबळ उडाली आहे.  Print


News - Rajy | Posted : 2022-03-21
Related Photos