२५ आणि २६ ऑगस्ट रोजी मेक इन गडचिरोली तर्फे रोजगार आणि कामगार मेळावा


- आ.डाॅ. देवराव होळी यांची पत्रकार परिषदेतून माहिती
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
मेक इन गडचिरोलीच्या वतीने येत्या २५ आणि २६ ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील बेरोजगारांसाठी तसेच कामगारांसाठी रोजगार आणि कामगार मेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती मेक इन गडचिरोलीचे मुख्य संयोजक तथा गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डाॅ. देवराव होळी यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे.
पत्रकार परिषदेला नगराध्यक्षा योगिताताई पिपरे, भाजपा किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष रमेश भुरसे, नगर परिषदेचे उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, पंचायत समिती उपसभापती विलास दशमुखे, नगरसेवक प्रमोद पिपरे, केशव निंबोळ, देवोजवार, अनिल पोहनकर, शंकर नैताम, बंगाली आघाडीचे शहा, हेमंत बोरकुटे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना आ.डाॅ. होळी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात मेक इन इंडिया ही संकल्पना राबविली. त्याच धर्तीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेक इन महाराष्ट्र ही संकल्पना राबविली. त्यामुळे आपणही गडचिरोली जिल्ह्यात मेक इन गडचिरोली ही संकल्पना राबविली. मागील साडेचार वर्षांच्या कार्यकाळात अनेक रोजगार निर्मितीचे प्रयत्न केले. याचा लेखाजोखा येत्या २५ व २६ ऑगस्ट च्या मेळाव्यात सादर केला जाईल. 
रोजगार व कामगार मेळाव्यात शासनाच्या विविध विभागाचे स्टाॅल लावले जाणार आहेत. विविध महामंडळाच्या योजना, अनुदान याबाबत माहिती दिली जाणार आहे. विविध नामांकीत कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहून जिल्ह्यातील बेरोजगारांना अर्हतेनुसार रोजगार उपलब्ध करून देणार आहेत. पशुसंवर्धन, मत्स्यसंवर्धन, कृषी विभाग, एमआयडीसी, बॅंकांचे अधिकारी आणि प्रतिनिधी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. वनाधारीत उद्योगांची निर्मिती व्हावी याकरीता मार्गदर्शन केले जाणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी ३ जिल्ह्यांसाठी ५०० कोटींचे नियोजन पुढील पाच वर्षात रोजगार निर्मितीसाठी केले आहे. यामुळे अनेक उद्योग कार्यान्वित केले जाणार आहेत. तसेच आयोजित मेळाव्यामध्ये कामगार नोंदणी करून कामगारांना साहित्य सुध्दा वाटप केले जाणार आहेत. यामुळे बेरोजगार, युवक, युवती तसेच कामगारांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आ. डाॅ. देवराव होळी यांनी केले आहे.

 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-08-19


Related Photos