महत्वाच्या बातम्या

 देशाच्या प्रगतीसाठी क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्र अतिशय महत्वाचे : पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार


- बल्लारपूर येथे राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचा शुभारंभ

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर ही वाघांची भुमी आहे. राज्यस्तरीय स्पर्धेसाठी येथे आलेला प्रत्येक स्पर्धक वाघापेक्षा कमी नाही. क्रीडा क्षेत्राचा विकास होऊन त्यातून उत्कृष्ट खेळाडू निर्माण व्हावे, असा आपला मानस आहे. देशाच्या प्रगतीसाठी क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्र अतिशय महत्वाचे आहे, असे प्रतिपादन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

विसापूर ता. बल्लारपूर येथील तालुका क्रीडा संकूल येथे आयोजित राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचा (वयोगट 14 वर्षाखाली मुले / मुली) शुभारंभ करतांना ते बोलत होते. यावेळी मंचावर वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंग चंदेल, जि.प.माजी अध्यक्ष देवराव भोंगळे, माजी नगराध्यक्ष हरीश शर्मा, क्रीडा विभागाचे उपसंचालक डॉ. शेखर पाटील, बल्लारपूरच्या उपविभागीय अधिकारी डॉ. दिप्ती सुर्यवंशी, तहसीलदार स्नेहल राहाटे, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, छत्रपती पुरस्कार विजेते कुंदन नायडू आदी उपस्थित होते.

वाघांच्या भुमीत राज्यभरातून आलेले सर्व स्पर्धक व त्यांच्या पालकांना मोफत ताडोबा सफारीचा आनंद घेता येईल, अशी घोषणा करून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, या परिसरातील बॉटनिकल गार्डन आणि सैनिकी शाळा सर्वांनी अवश्य पाहावी. क्रीडा क्षेत्राच्या प्रगतीसाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अतिशय प्रयत्नशील आहेत. तोच वसा घेऊन चंद्रपुरात क्रीडा क्षेत्राचा विकास करण्यात येत आहे. राज्यातील तीन स्मार्ट सिंथेटिक ट्रॅक चंद्रपूर, बल्लारपूर आणि सैनिकी शाळेत आहे. चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्याचा पालकमंत्री असल्यामुळे आपण या दोन्ही जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात एक -एक कोटीचे अत्याधुनिक जीम तयार करण्याच्या सुचना दिल्या आहेत. बल्लारपूर येथील क्रीडा संकुलात सौरउर्जा व्यवस्था करण्यासाठी 83 लक्ष निधीला मान्यता दिली आहे. एवढेच नाही तर 1 कोटी 78 लक्ष रुपये खर्च करून बल्लारपूर येथे स्टेडीयम उभे राहात आहे.

वन अकादमी येथे इनडोअर बॅडमिंटन कोर्ट आणि जलतरण तलावासाठी 15 कोटी मंजुर झाले आहेत. वीर शहीद बाबुराव शेडमाके स्टेडीयमकरीता 25 कोटी मंजुर आहेत. येथे वातानुकूलित आणि सौरउर्जा सुविधांसह स्टेडीयम तयार होणार आहे. चंद्रपूरच्या स्टेडीयमकरीता 58 कोटींचा प्रस्ताव तयार केला आहे. क्रीडा, सांस्कृतिक, शिक्षण व इतर क्षेत्रातील हिरे शोधण्यासाठी जिल्ह्यात ‘मिशन कोहिनूर’ राबविण्यात येईल. यात कबड्डी, क्रिकेट, खो-खो, ॲथलेटिक्स आदींचा समावेश राहील. राज्याचा अर्थमंत्री असतांना महाराष्ट्रातील संपूर्ण तालुक्यात प्रत्येकी 5 कोटींचे स्टेडीयम व्हावे, असा प्रस्ताव आपण मांडला होता. क्रीडा क्षेत्रात आमुलाग्र क्रांती व्हावी, हीच आपली अपेक्षा आहे.

जगात ऑलम्पिक स्पर्धेला 1900 मध्ये सुरवात झाली. मात्र आतापर्यंत भारताने फक्त 35 पदके प्राप्त केली आहेत. त्यातील 8 पदके ही हॉकीतील आहेत. देशाचा नावलौकिक वाढविण्यासाठी खेळाडूंनी खूप मेहनत करावी. क्रीडा क्षेत्रात नैपुण्य प्राप्त करा. जीवनातील आनंद आणि चेह-यावरील हास्य हे जगातील सर्वात महागडे सौंदर्यप्रसादन आहे. तसेच आई-वडीलांचा आशिर्वाद हा आपल्यासाठी अनमोल आहे. अर्जुनाच्या केवळ कथा वाचू नका तर त्याच्यासारखे लक्ष्य प्राप्तीसाठी प्रयत्न करा. महाराष्ट्राचा डंका सर्वदूर पसरू द्या, असे आवाहन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते उत्कृष्ट खेळाडू आणि शारीरिक शिक्षक महेश डोंगरे, उमेश कडू, शिवाजी नागरे यांचा सत्कार करण्यात आला.

प्रास्ताविकेत जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड म्हणाले, पालकमंत्र्यांच्या पुढाकारामुळेच या स्पर्धा चंद्रपुरात होत आहे. या स्पर्धेसाठी राज्यभरातून 225 खेळाडू आणि 175 पालक आले आहेत, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे संचालन उमेश कडू यांनी केले. यावेळी नामदेव डाहुले, सुदर्शन निमकर, सुनील उरकुडे, ॲथलेटिक संघटनेचे अध्यक्ष डॉ. राकेश तिवारी, सुरेश अडेपवार, प्रशांत दोंतुलवार यांच्यासह तालुका क्रीडा अधिकारी व खेळाडू उपस्थित होते.





  Print






News - Chandrapur




Related Photos