महत्वाच्या बातम्या

 भद्रावतीत कारमधून गांजा विक्रीचा पर्दाफाश : ५.४० लाखांचा मुद्देमाल जप्त


- दोन तरुणांसह विधीसंघर्षग्रस्त बालक पोलिसांच्या ताब्यात; १ किलो १७० ग्रॅम गांजा हस्तगत

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भद्रावती : शहरातील पंचशील नगर वॉर्ड परिसरात कारमधून गांजाची विक्री सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर भद्रावती पोलिसांनी धडक कारवाई केली. या कारवाईत दोन तरुणांसह एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून १ किलो १७० ग्रॅम गांजा, तीन मोबाईल फोन आणि स्विफ्ट डिझायर कार असा एकूण ५ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई २४ ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजता पंचशील नगर वॉर्ड परिसरात करण्यात आली. पोलिसांना या परिसरात पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट डिझायर कार क्रमांक MH-४९-AE-१३४० मधून काही इसम गांजा बाळगून त्याची विक्री करीत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. माहितीची खात्री करून पोलिसांनी संबंधित ठिकाणी सापळा रचत कारवाई केली.

पोलिसांनी संशयित कारची झडती घेतली असता त्यामध्ये उग्र वास असलेली पाने, फुले व देठ असलेली हिरवट रंगाची वनस्पती आढळून आली. तपासणीत हा १ किलो १७० ग्रॅम गांजा असल्याचे निष्पन्न झाले. त्याची अंदाजे किंमत १५ हजार रुपये आहे.

या कारवाईत वाजीद वहाब शेख (२३ वर्षे) आणि आसीफ कौसर सैयद (२१ वर्षे), दोघेही रा. पंचशील नगर वॉर्ड, भद्रावती, यांच्यासह एका विधीसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेण्यात आले.

गांजा, मोबाईल फोन आणि वाहनासह जप्त करण्यात आलेल्या संपूर्ण मुद्देमालाची किंमत ५ लाख ४० हजार रुपये आहे. याप्रकरणी एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहेत.

सदर ची कार्यवाही पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक, ईश्वर कातकाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल, पो.नि. योगेश्वर पारधी यांचे मार्गदर्शनात परि पोलीस उप. अधिक्षक सचिन खेत्रे, यांचे नेतुत्वात सपोनी संजय मिश्रा, गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक संतोष केदार, गजानन तुपकर, सफौ. महेन्द्र बेसरकर, पो.हवा. अनुप आस्टूनकर, देवानंद डुकरे, गोपाल आतकुलवार, धर्मराज मुंडे पो.अं. खुशाल कावळे, योगेश घाटोळे, संतोष राठोड यांनी केले.





  Print






Related Photos