महत्वाच्या बातम्या

 लोहारा हायस्कूलमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात


- खेलेगा भारत, जीतेगा भारत संकल्पनेतून विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन , विद्यार्थ्यांची सायकल रॅली

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भांडारा : रतिरामजी टेंभरे हायस्कूल व कला, विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, लोहारा येथे हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंती राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने शाळेत २८ ते ३० ऑगस्टदरम्यान खेलेगा भारत, जीतेगा भारत या संकल्पनेतून विविध क्रीडा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये खेळांविषयी आवड निर्माण व्हावी, त्यांच्यातील क्रीडागुणांना वाव मिळावा तसेच शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे, या उद्देशाने विविध खेळांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी या उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.

विद्यार्थ्यांची सायकल रॅली -
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांनी सायकल रॅली काढली. रॅलीत विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत क्रीडा आणि आरोग्याचा संदेश दिला. सायकल रॅलीमुळे शाळेच्या परिसरात क्रीडामय वातावरण निर्माण झाले होते. यावेळी क्रीडा शिक्षक डी. के. कटरे यांनी विद्यार्थ्यांना मेजर ध्यानचंद यांच्या जीवनकार्याची माहिती दिली. भारतीय हॉकीच्या क्षेत्रात मेजर ध्यानचंद यांनी दिलेल्या योगदानाची माहिती विद्यार्थ्यांना देत त्यांच्या क्रीडाप्रेमातून आणि समर्पणातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.

खेळांचे महत्त्व विशद -
मुख्याध्यापिका एन. आर. रहांगडाले यांनी विद्यार्थ्यांच्या जीवनात खेळांचे असलेले महत्त्व विशद केले. अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांनी नियमितपणे खेळांमध्ये सहभागी होणे आवश्यक असून, खेळामुळे शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच शिस्त, संघभावना, आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण विकसित होतात, असे त्यांनी सांगितले. २८ ते ३० ऑगस्टदरम्यान आयोजित विविध क्रीडा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना खेळांमध्ये आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळाली. शाळेतील शिक्षकवृंदाने या संपूर्ण उपक्रमासाठी मोलाचे सहकार्य केले. राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाविषयक सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, ‘खेलेगा भारत, जीतेगा भारत’ या संकल्पनेला शाळेतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.





  Print






Related Photos