दोन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा दरोड्याचा फरार आरोपी अखेर जेरबंद : माजरी पोलिसांची कारवाई


विदर्भ न्युज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : अंगावर तलवार फिरवत धमकी देऊन पाच हजार रुपये जबरदस्तीने लुटल्याच्या गुन्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या फरार आरोपीला माजरी पोलिसांनी अखेर अटक केली. शिवचरण मल्लार ऊर्फ हबीसिंग समत्या केवट असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी २७ ऑगस्ट २०२६ रोजी त्याला ताब्यात घेत कायदेशीर कारवाई केली.
प्राप्त माहितीनुसार, ८ सप्टेंबर २०२४ रोजी पहाटे सुमारे २.४५ वाजता माजरी परिसरातील ओसीएम नागलोन कोळसा सायडिंग येथे फिर्यादी ड्युटीवर असताना आरोपी शिवचरण केवट याने त्याच्या साथीदारांसह मिळून दरोडा टाकण्याच्या उद्देशाने फिर्यादीवर तलवार फिरवत धमकी दिली. त्यानंतर फिर्यादीकडील सुमारे ५ हजार रुपये जबरदस्तीने चोरी करण्यात आल्याची तक्रार पोलिसांत दाखल झाली होती.
या प्रकरणी माजरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६४/२०२४ नोंद करण्यात आला होता. या गुन्ह्यातील इतर आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली होती. मात्र, शिवचरण केवट हा गुन्हा दाखल झाल्यापासून पोलिसांना चकवा देत फरार होता.
फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष प्रयत्न सुरू ठेवले. अखेर मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी नियोजनबद्ध कारवाई करत २७ ऑगस्ट रोजी शिवचरण केवट याला ताब्यात घेऊन अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याची एमसीआर मंजूर करून जिल्हा कारागृह, चंद्रपूर येथे रवानगी केली.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बकाल यांच्या मार्गदर्शनाखाली माजरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि सुबोध वंजारी, पोलीस उपनिरीक्षक हरिदास चोपणे, पोलीस अंमलदार अनिश शेख तसेच चापोहवा राजेश सोनेकर, पोअं प्रमोद मिलमिले यांनी केले.




Petrol Price




