सेवा संकल्प अभियानांतर्गत युवकांना विविध योजनांची माहिती : रोजगार, कौशल्य विकास व उद्योजकतेबाबत मार्गदर्शन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, भंडारा यांच्या वतीने युवक-युवतींमध्ये रोजगार, कौशल्य विकास व उद्योजकतेशी संबंधित विविध शासकीय योजना व उपक्रमांची जनजागृती करण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून विविध शैक्षणिक संस्था तसेच शासकीय कार्यालयांमध्ये युवकांना योजनांची माहिती व मार्गदर्शन देण्यात येत आहे.
या अभियानांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, लाखांदूर तसेच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, लाखांदूर येथे मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी विजय पांडव यांनी उपस्थित विद्यार्थी व युवकांना विविध शासकीय योजना व उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. तसेच तहसील कार्यालयातील सुहास बोंदरे, अतुल पडोळे, यांनी स्टॉलच्या माध्यमातून उमेदवार, विद्यार्थी व युवकांना विविध योजनांची माहिती व मार्गदर्शन केले.
यावेळी सेवायोजन कार्ड वेबपोर्टलवर नाव नोंदणी, रोजगारासाठी सहकार्य, रोजगार मेळावे, अल्प मुदतीचे कौशल्य विकास प्रशिक्षण, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, सेवा-सोसायटी नोंदणी, करिअर ग्रंथालय सदृश अभ्यासिका, उद्योजकतेसंदर्भातील नाविन्यपूर्ण उपक्रम तसेच इनक्युबेशन सेंटर आदींबाबत मार्गदर्शन करण्यात आले.उपलब्ध शासकीय सेवा व योजनांचा लाभ घेऊन युवकांनी रोजगार, कौशल्य विकास, प्रशिक्षण तसेच स्वयंरोजगाराच्या संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, लाखांदूर येथे २३५ विद्यार्थी-विद्यार्थिनी, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, लाखांदूर येथे १४५ विद्यार्थी-विद्यार्थिनी, तर तहसील कार्यालय, भंडारा येथे ४५ युवक-युवतींनी या उपक्रमाचा लाभ घेतला. अशा प्रकारे तिन्ही कार्यक्रमांमध्ये एकूण ४२५ विद्यार्थी-विद्यार्थिनी व युवक-युवतींची उपस्थिती होती.
या कार्यक्रमांचे आयोजन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, भंडारा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या उपक्रमाच्या माध्यमातून युवकांमध्ये कौशल्य विकास, रोजगार, प्रशिक्षण व उद्योजकतेच्या विविध संधींबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.




Petrol Price




