प्रजासत्ताकदिनी महाराष्ट्रातील कारागृहातून १८९ कैद्यांची होणार सुटका


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / पुणे : स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांच्या स्मरणार्थ केंद्र सरकारच्या विशेष माफी कार्यक्रमांतर्गत प्रजासत्ताकदिनी ठाणे मध्यवर्ती कारागृहातील तीन कैद्यांसह एकूण १८९ कैद्यांची महाराष्ट्राच्या कारागृहातून सुटका करण्यात येणार आहे.
स्वातंत्र्याच्या अमृतमहाेत्सवी वर्षानिमित्त कारागृहात वेगवेगळ्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या राज्यातील १८९ कैद्यांची शिक्षा माफ करण्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने कारागृहात चांगली वर्तणूक असलेल्या देशभरातील कैद्यांची शिक्षा माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.
एका अधिकाऱ्याने रविवारी ही माहिती दिली. ते म्हणाले, ठाण्यातील तीन कैदी खुनाचा प्रयत्न आणि इतर गुन्ह्यांमध्ये तुरुंगवास भोगत आहेत.
विशेष माफी कार्यक्रमांतर्गत, काही कैद्यांना त्यांच्या शिक्षेच्या कालावधीत चांगल्या वर्तनासाठी २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट रोजी सोडले जाईल. महाराष्ट्रातील एकूण १८९ कैद्यांची सुटका केली जाईल, असे अधिकाऱ्याने सांगितले.
ते म्हणाले की, कैद्यांची वय, तुरुंगात घालवलेला वेळ, अपंगत्व, आरोग्य आणि इतर बाबींच्या आधारे निवड केली जाते. अधिकाऱ्यांनी सांगितले की, ठाणे मध्यवर्ती कारागृहात ४,५६९ कैदी असून त्यापैकी १३२ महिला आहेत. त्यापैकी ५२ कैदी ७० वर्षांवरील तर ३८६ कैदी २० वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. मात्र, कारागृहाची क्षमता केवळ १,१०५ कैद्यांची आहे.
सुटका करण्यात येणाऱ्या एकूण कैद्यांमध्ये ३० बांगलादेशी आणि तितक्याच नायजेरियन नागरिकांचा समावेश आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, महाराष्ट्रातील तुरुंगातील कैद्यांची एकूण संख्या ४३,०९० आहे.
News - Rajy