महत्वाच्या बातम्या

 गर्भलिंगनिदान होत असलेल्या केंद्रावर कडक कारवाई करा : जिल्हाधिकारी विनय गौडा


- पीसीपीएनडीटी कायदा अंमलबजावणी आढावा बैठक

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्ह्यात स्त्रीभ्रूणहत्या टाळून लिंग गुणोत्तराच्या प्रमाणातील दरी कमी करण्यासाठी पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे गर्भलिंग निदान चाचणी होत असलेल्या सोनोग्राफी केंद्र तसेच रुग्णालयांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात दक्षता पथकाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, महिला व बालविकास अधिकारी संग्राम शिंदे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमचंद कन्नाके, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार, डॉ. नयना उत्तरवार, कोरपणाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.गायकवाड, गडचांदूरचे डॉ. संजय गाठे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी गौडा म्हणाले, जिल्ह्यात एक व दोन मुलीवर किती गर्भपात झाले, याची काटेकोरपणे तपासणी करावी व याबाबत सखोल माहिती घ्यावी. एखाद्या सोनोग्राफी केंद्रावर गर्भलिंग निदान होत असल्यास त्याच्या माहितीसाठी गुप्तचर विभागाची मदत घ्यावी. डिकॉय केसवर अद्यापपर्यंत कार्यवाही केलेली दिसून येत नाही त्यावर गांभीर्याने लक्ष द्यावे. तसेच ज्याठिकाणी लिंगनिदान होते, अशा सोनोग्राफी केंद्रांवर कडक कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिले.

जिल्हाधिकारी गौडा पुढे म्हणाले, पीसीपीएनडीटी संदर्भात एक प्लॅन तयार करावा. सर्व वैद्यकीय अधीक्षकाने मागील सहा महिन्याचा जन्म गुणोत्तर तपासून घ्यावा. तसेच जिल्ह्यात स्त्री-पुरुषाचे लिंग गुणोत्तर संतुलित राहण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी. महानगरपालिका क्षेत्रात अनधिकृतपणे लिंगनिदान होत असल्यास संबंधित केंद्रावर तसेच संशयित सोनोग्राफी केंद्रावर कठोर कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. जिल्ह्यातील सर्व सोनोग्राफी केंद्रावर टोल-फ्री क्रमांक दर्शविणारे माहिती फलक अथवा पोस्टर दर्शनी भागात लावावेत, असेही ते म्हणाले.





  Print






News - Chandrapur




Related Photos