भुमकाल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलास मोठे यश
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : १५ जानेवारी २०२३ ला उपविभाग अहेरी अंतर्गत येणाऱ्या उपपोस्टे पेरमिली हद्दीतील मौजा बेडमपल्ली जंगल परिसरात विशेष अभियान पथकाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना दुपारी ०२.०० वाजतच्या दरम्यान सदर जंगल परिसरात २० ते २५ अशा मोठ्या संख्येतील नक्षलवाद्यांनी पोलीस जवानांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने जवानांच्या दिशेने जोरदार गोळीबार केले. विशेष अभियान पथकांच्या बहादूर जवानांनी प्रत्युत्तरादाखल व स्वसंरक्षणासाठी नक्षलवाद्यांच्या दिशेने गोळीबार केले असता, जवानांचा वाढता दबाव पाहून नक्षलवाद्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत पळ काढले. भूमकाल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घातपाताची नक्षलवाद्यांची कुटील योजना गडचिरोली पोलीस दलाच्या जवानांनी हाणून पाडले.
नक्षल चकमकीनंतर सदर जंगल परिसरात जवानांनी शोध अभियान राबविले असता, त्यामध्ये ०१ नग भरमार, ०१ नग पिस्टल, ०१ नग वॉकीटॉकी चार्जर व इतर मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य हस्तगत करण्यात यश प्राप्त केले. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिता, अपर पोलीस अधीक्षक अहेरी यतिश देशमुख यांच्या देखरेखीखाली पार पडले.
विशेष अभियान पथकाच्या जवानांच्या या शौर्यपूर्ण कामगिरीचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी कौतुक केले असून, सदर परिसरात नक्षलविरोधी अभियान अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले आहे.
News - Gadchiroli