महत्वाच्या बातम्या

 कच्च्या मालाच्या दरवाढीने गणेशमूर्ती महागल्या : मूर्तिकारांची लगबग वाढली


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : गणेशोत्सवाची चाहूल लागताच शहरासह ग्रामीण भागातील मूर्तिकारांच्या कार्यशाळांमध्ये लगबग वाढली आहे. गणेशमूर्तींना अंतिम रूप देण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून, यंदा मात्र वाढलेल्या कच्च्या मालाच्या किमतीमुळे मूर्तिकारांसह गणेशभक्तांनाही आर्थिक झळ सोसावी लागणार आहे. शाडूची माती, तणस, सजावटीचे साहित्य आणि अन्य आवश्यक साहित्याच्या दरात वाढ झाल्याने गणेशमूर्तींच्या किमतीत सुमारे १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. यंदा १४ सप्टेंबर रोजी गणेशमूर्तींची स्थापना होणार आहे. त्यामुळे मूर्तिकारांकडे आलेल्या ऑर्डर पूर्ण करण्यासाठी दिवस-रात्र मेहनत सुरू आहे. पर्यावरणपूरक मूर्ती तयार करण्यासाठी आवश्यक असलेली शाडूची माती व अन्य नैसर्गिक साहित्य विविध ठिकाणांहून आणावे लागते. वाहतूक खर्चासह साहित्याच्या किमती वाढल्याने मूर्ती तयार करण्याचा एकूण खर्च वाढला आहे.

 मूर्ती तयार करण्यासाठी लागणारे तणस, माती तसेच साज-शृंगाराचे साहित्य वेगवेगळ्या ठिकाणांहून आणावे लागते. मूर्ती तयार करण्याइतकेच तिच्या साज-शृंगारासाठीही मोठा वेळ आणि खर्च होतो. ऑर्डर मिळाल्यानंतर साधारण १० ते १२ दिवस आधीपासून कामाला सुरुवात करावी लागते. या कामात कुटुंबातील सदस्यांचीही मोठी मदत मिळते. जिल्ह्यात यंदा दोन-तीन फुटांपासून तब्बल दहा फुटांपर्यंतच्या विविध आकारांच्या गणेशमूर्ती तयार केल्या जात आहेत. मूर्तींच्या आकारानुसार त्यासाठी लागणारा कच्चा माल आणि मेहनत वाढत असल्याने त्याचा थेट परिणाम किमतीवर होत आहे.

गणेशोत्सवानंतर येणाऱ्या नवरात्रोत्सवासाठी देवीच्या मूर्ती तयार करण्याची तयारीही सुरू झाली आहे. माती, कच्चा माल आणि साज-शृंगाराच्या साहित्याच्या किमती वाढल्याने देवीच्या मूर्तींच्या दरातही १५ ते २० टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता मूर्तिकारांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात मूर्ती खरेदीचा खर्च वाढणार आहे.

कच्च्या मालाच्या दरवाढीचा परिणाम गणेशोत्सवातील मंडप आणि विद्युत रोषणाईच्या कामावरही झाला आहे. मंडप उभारणीसाठी लागणाऱ्या साहित्याच्या किमती वाढल्या असून, त्यासोबत मजुरीचे दरही वाढले आहेत. पावसाची शक्यता लक्षात घेता मंडपावर ताडपत्री टाकण्यासाठी अतिरिक्त खर्च करावा लागतो. विद्युत रोषणाईसाठी लागणाऱ्या मनुष्यबळासाठीही अधिक मजुरी द्यावी लागत असल्याने पूर्वनिश्चित दरात काम करणे डेकोरेशन व्यावसायिकांसाठी कठीण झाले आहे. कच्च्या मालापासून ते मजुरीपर्यंत वाढलेल्या खर्चामुळे यंदा सार्वजनिक गणेश मंडळांच्या उत्सवाच्या नियोजनावरही आर्थिक ताण येण्याची शक्यता आहे.





  Print






Related Photos