महत्वाच्या बातम्या

 विशेष ग्रामसभेसाठी कोठारीत तरुणांचे तीन दिवसांपासून आंदोलन


- ग्रामपंचायतीकडून वारंवार मागणी करूनही ग्रामसभा न घेतल्याचा आरोप; माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप व सुभाष धोटे यांचा आंदोलनाला पाठिंबा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : गावातील विविध प्रलंबित समस्या आणि विकासकामांवर चर्चा करण्यासाठी विशेष ग्रामसभा घेण्यात यावी, अशी वारंवार मागणी करूनही ग्रामपंचायतीकडून दखल घेतली जात नसल्याचा आरोप करीत कोठारी येथील तरुणांनी आंदोलन सुरू केले आहे. ५ सप्टेंबरपासून सुरू असलेल्या या आंदोलनाचा आज तिसरा दिवस असून, आंदोलनाला गावकऱ्यांचा वाढता पाठिंबा मिळत आहे. दरम्यान, माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप आणि माजी आमदार सुभाष धोटे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन तरुणांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शविला.

कोठारी ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत गावातील नागरिकांमध्ये नाराजी असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. गावाच्या विकासाकडे ग्रामपंचायतीकडून सातत्याने दुर्लक्ष होत असून, नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यात ग्रामपंचायत अपयशी ठरल्याचा आरोप करण्यात आला आहे. या समस्यांवर ग्रामस्थांसमोर चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्यासाठी विशेष ग्रामसभा घेण्यात यावी, अशी मागणी ग्रामपंचायतीकडे वारंवार निवेदनाद्वारे करण्यात आली होती. मात्र, मागणी करूनही विशेष ग्रामसभा घेण्यात आली नसल्याने अखेर गावातील तरुणांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. ग्रामस्थांनी वेळ मागूनही सरपंचांनी आंदोलकांची प्रत्यक्ष भेट घेण्याचे टाळल्याचा आरोपहीआंदोलनकर्त्यांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या कथित मनमानी कारभाराच्या निषेधार्थ तरुणांनी ५ सप्टेंबरपासून आंदोलन सुरू केले.

 ग्रामसभा हा ग्रामस्थांचा सर्वोच्च अधिकार -

 अ‍ॅड. चटप रविवारी माजी आमदार तथा शेतकरी नेते अ‍ॅड. वामनराव चटप यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन तरुणांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आंदोलकांच्या मागण्या जाणून घेतल्या. लोकशाहीत ग्रामसभा हा ग्रामस्थांचा सर्वोच्च अधिकार आहे. मागणी करूनही जर विशेष ग्रामसभा टाळली जात असेल, तर तो ग्रामस्थांच्या हक्कांवर घाला आहे. पारदर्शक कारभार करणे हे ग्रामपंचायतीचे कर्तव्य आहे, असे अ‍ॅड. चटप यांनी सांगितले. आंदोलनकर्त्यांच्या मागण्या रास्त असल्याचे सांगत त्यांनी या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या भेटीमुळे आंदोलनकर्त्यांना पाठबळ मिळाले आहे.

सुभाष धोटे यांचाही पाठिंबा -

माजी आमदार सुभाष धोटे यांनीही आंदोलनाला भेट देऊन तरुणांच्या मागण्यांना पाठिंबा दिला. गावातील प्रश्न लोकशाही मार्गाने मांडण्याचा अधिकार ग्रामस्थांना असून, विशेष ग्रामसभेच्या माध्यमातून गावातील समस्या आणि विकासकामांवर चर्चा होणे आवश्यक असल्याची भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आली.

 आंदोलन तीव्र करण्याचा इशारा -

विशेष ग्रामसभा घेण्याच्या मागणीवर अद्याप ठोस निर्णय झालेला नसल्याने आंदोलनकर्त्यांमध्ये नाराजी कायम आहे. तीन दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला गावकऱ्यांचा वाढता प्रतिसाद मिळत असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. ग्रामपंचायतीने तातडीने विशेष ग्रामसभा बोलावून गावातील विविध समस्या, विकासकामे आणि इतर महत्त्वाच्या विषयांवर ग्रामस्थांसमोर चर्चा करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. प्रशासनाने आणि ग्रामपंचायतीने या मागणीची दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा तरुणांनी दिला आहे. विशेष ग्रामसभेच्या मागणीवर ग्रामपंचायत प्रशासन काय भूमिका घेते आणि आंदोलनावर तोडगा कधी निघतो, याकडे आता कोठारी ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.





  Print






Related Photos