२ आॅक्टोबर रोजी विदर्भ राज्य आंदोलन समिती करणार सामुहिक उपोषण


- २०१९ च्या निवडणूकीपूर्वी विदर्भ राज्य न दिल्यास आंदोलन तिव्र करणार
- पत्रकार परिषदेतून राम नेवले यांची माहिती
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली
: २ आॅक्टोबर रोजी गांधी जयंतीदिनी विदर्भ राज्य आंदोलन समिती विदर्भातील ११ जिल्हे आणि १२० तालुक्यांमध्ये सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सामुहिक उपोषण आंदोलन करणार असल्याची माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य संयोजक राम नेवले यांनी आज १३ आॅगस्ट रोजी स्थानिक प्रेस क्लब भवनात आयोजित पत्रकार परिषदेतून दिली आहे.
पत्रकार परिषदेला विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या पश्चिम विदर्भ महिला आघाडी अध्यक्षा रंजनाताई मामर्डे, नागपूर शहर महिला आघाडी अध्यक्षा विजयाताई एस. धोटे, गडचिरोली जिल्हा उपाध्यक्ष जगदिश बद्रे, डाॅ. देविदास मडावी, कोअर कमिटी सदस्य शालिक पा. नाकाडे, महीला आघाडी प्रमुख मनिषा सजनपवार, गडचिरोली जिल्हा उपाध्यक्ष घिसु पा. खुणे आदी उपस्थित होते. 
२ आॅक्टोबर रोजी संपूर्ण विदर्भात विदर्भ राज्याच्या निर्मितीच्या मागणीला घेवून उपोषण करण्यात येत आहे. याबाबत संपूर्ण विदर्भात समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. आज १३ आॅक्टोबर रोजी गडचिरोली येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली.  २ आॅक्टोबर रोजीच्या उपोषण आंदोलनानंतर पुढील आंदोलनाची तिव्रता वाढविली जाणार आहे, असेही राम नेवले म्हणाले.
विदर्भ राज्य निर्मितीचे दिलेले आश्वासन विद्यमान सरकारने पाळले नाही. तसेच खोटी आश्वासने देवून, थापा मारून विदर्भात आपले वर्चस्व निर्माण केले. शेतकऱ्यांना उत्पादन खर्च अधिक ५० टक्के हमी भावाचे दिलेले आश्वासन पाळले नाही. वर्षाला २ कोटी लोकांना रोजगार देवू, असे आश्वासन दिले, तेसुध्दा पाळले नाही. केवळ वर्षाकाळी १ लाख १३ हजार लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला. शेतकऱ्यांसाठी ३४ हजार कोटींची कर्जमाफी देण्याची घोषणा केली. मात्र प्रत्यक्षात १५ हजार ८८५ कोटी रूपयांची कर्जमाफी दिल्याचा आकडा असून त्यापैकी अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ष लोटूनही रक्कम जमा झालेली नाही. आरक्षणाच्या मुद्द्यावर सध्या सरकारची कोंडी झालेली आहे. अनेक समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले. मात्र एकाही समाजाला अद्याप आरक्षण जाहिर केले नाही. याचाच परिणाम म्हणून सध्या विविध समाजाचे मोर्चे सरकारविरोधात निघत आहेत. यामुळे हे सरकार जनतेच्या प्रश्नांना महत्व देत नसून सत्ता काबिज करणे हा एकच उद्देश त्यांच्यासमोर आहे, असेही राम नेवले म्हणाले.
२०१९ च्या निवडणूकांची तयारी सध्या जोमात सुरू आहे. या निवडणूकीआधी विदर्भ राज्याची घोषणा केली नाही तर विदर्भातून भाजपालाच हटवू. निवडणूकीआधी विदर्भ राज्य निर्मितीची घोषणा करण्यास बाध्य करण्यासाठी २ आॅक्टोबर रोजीचे आंदोलन आहे. या आंदोलनाची दखल न घेतल्यास आंदोलन तिव्र करून पुढील निवडणूकीत भाजपविरोधी भूमिका घेऊ. यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या २१ सदस्यांची समिती तयार करून वैदर्भिय नेत्यांचे मत जाणून घेतले जाणार आहे. यानंतर विदर्भ राज्य आंदोलन समिती पुढील निवडणूकीची रणनिती ठरविणार आहे, अशीही माहिती राम नेवले यांनी दिली आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-08-13


Related Photos