रेगडी ग्रामसभेचे प्रकरण पोलिस ठाण्यात : ग्रामस्थांकडून चौकशीची मागणी

- सलग ग्रामसभा पुढे ढकलल्याने ग्रामस्थ संतप्त , पाच वर्षांतील विकासकामे, निधी खर्च व घरकुल लाभार्थ्यांच्या तपशीलाची मागणी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील रेगडी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेचे प्रकरण आता थेट पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचले आहे. मागील पाच वर्षांतील विकासकामांवरील खर्च, ग्रामपंचायतीला प्राप्त झालेला निधी, विविध शासकीय योजनांचा लाभ तसेच घरकुल लाभार्थ्यांचा तपशील ग्रामस्थांनी मागितल्यानंतर ग्रामपंचायत प्रशासक सुरेखा गेडाम व काही सदस्यांनी पोलिसांत तक्रार केल्याने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामसभा नियोजित वेळेत न झाल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी अखेर पारंपरिक गोटूल भूमीत ग्रामसभा घेऊन विविध आर्थिक व्यवहारांची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली.
सलग दोन ग्रामसभा पुढे ढकलल्या -
रेगडी ग्रामपंचायतीची पहिली ग्रामसभा १३ ऑगस्ट रोजी नियोजित करण्यात आली होती. मात्र, अपुऱ्या उपस्थितीचे कारण देत ही सभा पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर २१ ऑगस्ट रोजी रीतसर नोटीस काढून ग्रामसभा आयोजित करण्यात आली. या वेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित झाले; मात्र ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित नसल्याने ग्रामसभेचे कामकाज अपेक्षित पद्धतीने होऊ शकले नाही. ग्रामपंचायतीचे दप्तर आणि आर्थिक नोंदी अधिकारी उपस्थित नसल्यामुळे उपलब्ध होऊ शकत नसल्याचे प्रशासकांकडून सांगण्यात आले. त्यानंतर ग्रामस्थांनी पुढील ग्रामसभा तातडीने घेण्याचा आग्रह धरला. त्यानुसार २८ ऑगस्टची तारीख निश्चित करण्यात आली. मात्र, २८ ऑगस्ट रोजी ग्रामस्थ ग्रामपंचायत कार्यालयात पोहोचले असता कार्यालयाला कुलूप असल्याचे आढळून आले. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली.
ग्रामस्थांची गोटूलमध्ये सभा -
ग्रामपंचायत कार्यालय बंद असल्याने ग्रामस्थांनी रेगडी येथील पारंपरिक गोटूल भूमीत एकत्र येत सभा घेतली. या सभेत मागील पाच वर्षांतील ग्रामपंचायतीच्या विकासकामांचा निधी व खर्च, ग्रामपंचायत कोष समितीचे आर्थिक व्यवहार, वनहक्क समितीशी संबंधित व्यवहार तसेच घरकुल मंजुरी आणि लाभार्थ्यांची माहिती याबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. ग्रामस्थांनी या सर्व बाबींची निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी व्हावी, असा ठरावही मंजूर केला.
पोलिसांत तक्रारीने नाराजी -
दरम्यान, ग्रामसभा घेण्याबाबत कोणतीही अधिकृत नोटीस काढण्यात आली नसल्याचे सांगत, ग्रामस्थांचा वाढता रोष पाहून ग्रामपंचायत प्रशासक सुरेखा गेडाम आणि काही सदस्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर काही तरुणांना पोलिस ठाण्यात चौकशीसाठी बोलावण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये आणखी नाराजी पसरली. ग्रामसभेत विकासकामे व आर्थिक व्यवहारांबाबत प्रश्न उपस्थित करणाऱ्या ग्रामस्थांवर पोलिस कारवाईचा मार्ग अवलंबण्यात आल्याबद्दल संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या.
जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार -
रेगडी ग्रामपंचायतीच्या मागील पाच वर्षांतील निधी खर्च, विकासकामे, घरकुल मंजुरी आणि विविध योजनांच्या अंमलबजावणीची चौकशी करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. ग्रामसभा अध्यक्ष अतुल लेकामी, सुधाकर पोटावी, तेजराव मन्नो, रुपेश मतलामी, सागर मांडवगडे, गुरुदेव कुळमेथे, जितेंद्र सोनटक्के यांच्यासह ग्रामस्थांनी सोमवारी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्याकडे यासंदर्भात तक्रार केली. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता असणे आवश्यक असून, मागील पाच वर्षांतील निधीचा हिशेब, विकासकामांची प्रत्यक्ष स्थिती आणि लाभार्थ्यांची निवड याची स्वतंत्रपणे तपासणी करण्यात यावी.
प्रशासकांचे स्पष्टीकरण -
या प्रकरणी ग्रामपंचायत प्रशासक सुरेखा गेडाम यांनी २८ ऑगस्ट रोजी सभा झाल्याचे सांगितले आहे. ग्रामसेवक संघटनेचा बहिष्कार असल्याने त्यांच्या जागी सभेचे सचिव म्हणून जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांनी अहवालवाचन केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, ग्रामपंचायत अधिकारी पी. डी. घुगलोत यांच्याकडूनही या प्रकरणी भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. ग्रामस्थांच्या आरोपांबाबत आणि ग्रामसभेच्या कामकाजाबाबत प्रशासनाकडून अधिकृत चौकशी झाल्यानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होण्याची शक्यता आहे. ग्रामसभा, पोलिस तक्रार आणि आर्थिक व्यवहारांच्या चौकशीच्या मागणीमुळे रेगडी गावातील वातावरण सध्या चर्चेचा विषय बनले आहे. ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची प्रशासनाने पारदर्शकपणे दखल घेऊन चौकशी करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.




Petrol Price




