महत्वाच्या बातम्या

 वडेगाव रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीखाली चिरडून बिबट्याचा मृत्यू


- रेल्वे रूळ ओलांडताना अपघात झाल्याचा वन विभागाचा प्राथमिक अंदाज; मृत बिबट्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठविणार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : गोंदिया ते चांदाफोर्ट मार्गावरून चंद्रपूरच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहू रेल्वेगाडीखाली चिरडून बिबट्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी ६ सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास घडली. वडेगाव रेल्वे स्थानकाजवळील पोल क्रमांक १०८५/१५ परिसरातील महालगाव शिवारात हा अपघात झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, वन विभागाने घटनास्थळी धाव घेत मृत बिबट्याची विल्हेवाट व शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण केली.

प्राप्त माहितीनुसार, रविवारी सकाळी गोंदिया येथून चांदाफोर्टमार्गे चंद्रपूरच्या दिशेने एक मालवाहू रेल्वेगाडी जात होती. याचदरम्यान अर्जुनी-मोरगावसमोरील वडेगाव रेल्वे स्थानकाजवळ महालगाव शिवारात बिबट्या रेल्वे रूळ ओलांडत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्याचवेळी आलेल्या मालगाडीखाली तो चिरडला गेला. रेल्वेगाडीखाली आल्याने बिबट्याच्या शरीराचे दोन भाग झाले होते. त्याचे शरीर एका बाजूला, तर मुंडके दुसऱ्या बाजूला पडलेले आढळून आले.

रेल्वे विभागाची वन विभागाला माहिती -
घटनेची माहिती रेल्वे विभागाकडून वन विभागाला देण्यात आली. माहिती मिळताच स्थानिक वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र बहुरे यांनी वन कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पाहणी करून मृत बिबट्याचा पंचनामा करण्यात आला. त्यानंतर मृतदेह स्थानिक वन आगारात आणण्यात आला.

वन विभागाच्या प्राथमिक पाहणीनुसार, बिबट्या रेल्वे रूळ ओलांडत असताना मालगाडीच्या धडकेत आल्याची शक्यता आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण आणि घटनेशी संबंधित अन्य बाबींची खातरजमा करण्यासाठी वन विभागाकडून पुढील तपास सुरू आहे.

शवविच्छेदन; विविध नमुने संकलित -
मृत बिबट्याचा वन आगारात शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदन प्रक्रियेदरम्यान मृत बिबट्याचे विविध नमुने घेण्यात आले असून, हे नमुने पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत. प्रयोगशाळेतील अहवाल प्राप्त झाल्यानंतर बिबट्याच्या मृत्यूबाबत अधिक स्पष्टता येणार आहे.

या वेळी उपवनसंरक्षक पवन जोग, तहसीलदार अनिरुद्ध कांबळे, प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी अविनाश मेश्राम, मानद वन्यजीव रक्षक रुपेश निंभारते, पशुधन विकास अधिकारी डॉ. कपिल कोरेटी, आशिष दुबे, प्राणीशास्त्र विभागाचे प्रा. कावडे, वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र बहुरे, क्षेत्र सहाय्यक बोरकर तसेच वन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

दरम्यान, रेल्वे मार्गालगत वन्यप्राण्यांचा वावर असल्याने अशा ठिकाणी वन्यजीवांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याची गरज या घटनेमुळे पुन्हा अधोरेखित झाली आहे. बिबट्याच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर वन विभागाकडून घटनास्थळाची पाहणी तसेच आवश्यक तपास करण्यात येत असून, प्रयोगशाळेचा अहवाल आणि तपासाच्या निष्कर्षानंतर पुढील बाबी स्पष्ट होणार आहेत.





  Print






Related Photos