दीना धरणाचे पाणी सोडल्याने रोवणीला आला वेग : चामोर्शी तालुक्यातील शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / चामोर्शी :
गडचिरोली जिल्हा सर्वात मोठा तालुका असलेल्या चामोर्शी तालुक्यात प्रामुख्याने धान पीक घेतले जाते. पावसाने मागील १० ते १५ दिवस दांडी मारल्याने जवळपास ४० टक्के रोवणी खोळंबल्या होत्या, जिल्ह्यात एकमात्र व चामोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना वरदान ठरलेल्या रेगडी येथील दीना धरणाचे पाणी सोडल्याने पुन्हा रोवणीच्या कामास वेग आला असून शेतकरी वर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. 
चामोर्शी तालुक्यातील रेगडी येथील मा.सा. कन्नमवार जलाशयाची एकूण पाणी साठवणूक क्षमता ६७.५४ क्युमेक्स इतकी असली तरी अपेक्षेप्रमाणे पर्जन्यमान न झाल्याने सध्या स्थितीत उपलब्ध पाणी साठा ४२.०१ क्युमेक्स इतका आहे. मागील वर्षी याच वेळात हा पाणी साथ ४६.५० क्युमेक्स इतका होता. गत वर्षी ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात पाणी सोडण्यात आले होते. परंतु या वर्षी पावसाने अचानक दांडी मारल्याने शेतकऱ्यांच्या मागणी नुसार रोवणी कामाकरिता व रोवलेल्या धान पिकास वाचविण्याकरिता पाण्याची अत्यंत आवश्यकता असल्याने शनिवारी ४ ऑगस्ट रोजी रेगडी जलाशयातून पाणी सोडण्यात आले. 
पाणी सोडण्याचे पहिले रोटेशन सुरु झाले असून जवळपास १५ दिवस पाणी सोडण्यात येणार आहे. त्यानंतर गरजेनुसार पाणी सोडण्यात येईल यावर्षी रेगडी परिसरात ७४४ मिमी पर्जन्यमान झाले असून जलाशयातून दररोज ०.५६५ क्युमेक्स पाणी नहराद्वारे सोडण्यात येत आहे. यामुळे रोवणीच्या कामास वेग आला आहे . सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून शेतकऱ्यांसह मजूर वर्गातही उत्साह निर्माण झाला आहे.   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-08-09


Related Photos