नागपूर येथे सुरु असलेल्या कोष्टी समाजाच्या हिंसक आंदोलनाशी आदिवासी हलबा-हलबी समाजाचा काही संबंध नाही


- विविध आदिवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची पत्रकार परिषदेतून माहिती 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : 
नागपूरच्या गांधीबागेतील रा. बा. कुंभारे स्मारक येथे १५ नोव्हेंबर पासून सुरु असलेल्या कोष्टी समाजाच्या हिंसक आंदोलनाशी खऱ्या हलबा-हलबी जमातीचा काही संबंध नसल्याची माहिती आदिवासी समाजाच्या विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आज पत्रकार परिषदेतून दिली . 
पत्रकार परिषदेत माहिती देतांना म्हणाले, नागपूर मध्ये विविध मागण्यासाठी कोष्टी जमातीच्या आंदोलनकर्त्यांनी स्वतःला हलबा कोष्टी सांगत आंदोलन सुरु केले आहे . मात्र त्यांच्याकडे कोणतेही लोकप्रतिनिधी आले नाही म्हणून त्यांनी बसगाड्यांची तोडफोड करून हिंसाचार केला . त्यांच्या या हिंसाचारी आंदोलनाशी खऱ्या आदिवासी हलबा जमातीचा काही  संबंध नाही. असे स्पष्ट केले आहे.  या संदर्भातील निवेदन आदिवासी विकास मंत्री व जिल्ह्याधिकाऱ्यांना सादर करण्यात आले असल्याची माहिती सुद्धा पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे . 
पुढे माहिती देतांना म्हणाले , महाराष्ट्रातील कोष्टी हलबा यांनी कधी आदिवासी, कधी इतर मागास वर्ग, तर कधी विशेष मागास प्रवर्ग च्या सवलती घेतल्या. एकाच आडनावांचे कोष्टी एसटी, एसबीसी, ओबीसी आहेत. तर काही ठिकाणी एकाच कुटुंबातील व्यक्ती वरील तिन्ही प्रवर्गात आहेत. या बाबत वरिष्ठ स्तरावरून चौकशी अशा प्रकारचा तिहेरी फायदा घेणारी हि महाराष्ट्रातील एकमेव जात असूनही व आदिवासींचे कोणतेही गुण वैशिष्ट्ये नसलेली जात आदिवासींमध्ये आरक्षण दावा करीत आहेत . 
या बाबतीत प्रचंड गोंधळ  निर्माण झाल्याने १९८५ मध्ये फरेरा कमेटी नियुक्त करण्यात येऊन त्यांनी दिलेल्या अहवालातही हलबा कोष्टी हे आदिवासी नाहीत हे सिद्ध झाले आहेत. तरी सुद्धा शालेय व शासकीय रेकार्डची खोडतोड करून मिळविलेल्या जात प्रमाणपत्रास वैद्य करणाऱ्या व आपल्या मागण्या मान्य करणाऱ्या व हिंसाचार करणाऱ्या हलबा कोष्ट्यांचा ह्या हिंसाचारी आंदोलनाचा हलबा/हलबी समाजातील कोणत्याही सदस्याचा संबंध नाही. 
आम्ही खरे हलबा / हलबी आदिवासी नेहमी न्यायालयाच्या निर्णयाचा मान करीत आलो आहोत. आतापर्यंत कधीही हिंसक आंदोलने केली नाहीत. तेव्हा हिंसक आंदोलन करणाऱ्यांना, शासनावर दबाव आणणाऱ्यांना व शासकीय  मालमत्तेची नुकसान करणाऱ्यांना योग्य ती समज देऊन न्यायालयीन निर्णयाचा मान राखून पुन्हा नाहक आम्ही खरे हलबी आहोत असे भासविणाचा प्रयत्न करू नये असे कळवावे . अशी मागणी करत या घटनेचा विविध आदिवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निषेध व्यक्त केला . 
यावेळी हलबा / हलबी संघटना अध्यक्ष तथा प.स. सभापती धानोरा अजमन रावटे,  हलबा / हलबी संघटना उपाध्यक्ष शालिक मानकर, आदिवासी गोंडगोवारी कोजा माजी अध्यक्ष गुलाब मडावी, आदिवासी नारीशक्ती संघटना कुसुमताई आलाम, सचिव जयश्री येरमे, देविदास मडावी, लक्ष्मण कोवे, जयलाल मार्गीया, सुलोचना मडावी, रेखा तोडासे आदी उपस्थित होते.     Print


News - Gadchiroli | Posted : 2018-11-22


Related Photos