महत्वाच्या बातम्या

 आपदग्रस्तांच्या वेदनांवर मायेची फुंकर : राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्याकडून मंचर्ला कुटुंबियांना मदतीचा हात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / अहेरी : आलेल्या अडचणींवर मात करून दुःखाचा डोंगर सर करून आपल्याला पुढे जायचे आहे. या प्रवासात आम्ही तुमच्या साथीला आहोत. अशा शब्दात गडचिरोलीचे माजी पालकमंत्री तथा अहेरी इस्टेटचे राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी देवलमरी येथील घर जळालेल्या मंचार्ला कुटुंबीयांना धीर देत मदतीचा हात देतांनाच त्यांनी भोगलेल्या वेदनांवर, त्यांच्या जखमांवर मायेची फुंकर घातली.

अहेरी तालुका मुख्यालयपासून १४ किलोमीटर अंतरावर असलेल्या देवलमरी येथील मुतय्या मंचर्ला हे शेखर व संतोष या दोन मुलांसह राहतात. तिघांचीही स्वतंत्र घरे आहेत. २ मार्च रोजी रात्री जेवण करून सर्वजण आपापल्या घरी झोपी गेले. पहाटे ३ वाजेच्या सुमारास घरांना आग लागली. आगीचे लोळ पाहून शेजाऱ्यांनी तिघांनाही जागे केले. त्यानंतर ते कुटुंबासह घराबाहेर पडले. या आगीत धान्य, कपडे, भांडी व इतर साहित्य जळून खाक झाले. आग आटोक्यात आणण्याची संधीही मंचर्ला कुटुंबियांना मिळाली नाही.

या आगीमध्ये पिता-पुत्रांचा संसार उघड्यावर आला. याची माहिती मिळताच माजी राज्यमंत्री तथा अहेरी इस्टेट चे राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी क्षणाचाही विलंब न लावता थेट देवलमरी गाठले अन मंचर्ला कुटुंबियांची भेट घेऊन मोठी आर्थिक मदत केली. एवढेच नव्हेतर यापुढेही कुटुंब जोमाने उभे राहण्यासाठी आवश्यक ती मदत दिली जाणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई द्या -

घराला लागलेल्या आगीमुळे तीन कुटुंबांची राख रांगोळी झाली असून मंचर्ला कुटुंबीयांना शासनाने त्वरित मदत द्यावी, अशी मागणी माजी राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी केली. एवढेच नव्हेतर तहसीलदार यांच्याशी भ्रमणध्वनी द्वारे संपर्क करून तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos