महत्वाच्या बातम्या

 आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी एक लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द : दुःखाच्या प्रसंगी कुटुंबीयांना दिला धीर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / एटापल्ली : धानोरा तालुक्यातील जपतलाई आश्रमशाळेच्या वसतिगृहात सर्पदंशामुळे मृत्यू झालेल्या एटापल्ली तालुक्यातील जव्हेली येथील १२ वर्षीय दीपिका एतवा लकडा हिच्या कुटुंबीयांना आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी आर्थिक मदतीचा हात दिला. मंगळवारी (१८) एटापल्ली दौऱ्यावर असताना त्यांनी दीपिकाच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले आणि एक लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.

दीपिका एतवा लकडा ही एटापल्ली तालुक्यातील जव्हेली येथील रहिवासी होती. ती शिक्षणासाठी धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील आश्रमशाळेत दाखल झाली होती. १० ऑगस्टच्या मध्यरात्री वसतिगृहात झोपलेली असताना सापाने दंश केल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. अवघ्या १२ वर्षांच्या दीपिकाच्या मृत्यूने लकडा कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. या घटनेने परिसरातही हळहळ व्यक्त करण्यात आली.

दीपिका ही एटापल्ली तालुक्यातील मूळ रहिवासी असल्याने आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी मंगळवारी एटापल्ली दौऱ्यादरम्यान लकडा कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कुटुंबीयांचे सांत्वन करून त्यांना धीर दिला. या दुःखाच्या प्रसंगी आपण लकडा कुटुंबाच्या पाठीशी सदैव उभे राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

कुटुंबाला आर्थिक आधार मिळावा, या उद्देशाने आमदार डॉ. आत्राम यांनी एक लाख रुपयांचा धनादेश कुटुंबीयांकडे सुपूर्द केला. संकटकाळात मिळालेल्या या मदतीमुळे दुःखात असलेल्या कुटुंबाला काहीसा आधार मिळाला आहे.

अंत्यसंस्कारासाठीही केली होती मदत -
दरम्यान, दीपिकाच्या निधनानंतर तिच्या अंत्यसंस्कारासाठीही आर्थिक मदत करण्यात आली होती. आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या सल्ल्यानुसार डॉ. मिताली आत्राम यांनी दीपिकाच्या अंत्यसंस्कारासाठी कुटुंबीयांना आर्थिक मदत केली होती.

दीपिकाच्या अकाली निधनामुळे कुटुंबावर आलेल्या संकटात आमदार आत्राम यांनी पुन्हा एकदा मदतीचा हात पुढे केला. कुटुंबीयांचे सांत्वन करताना त्यांनी त्यांना हिम्मत व धीर दिला आणि भविष्यातही आवश्यक त्या मदतीसाठी आपण उपलब्ध राहू, अशी ग्वाही दिली.





  Print






Related Photos