शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी १४ उमेदवारांना दिले एबी फॉर्म


वृत्तसंस्था / मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना - भाजप युतीची चर्चा अखेरच्या टप्प्यात सुरू असताना  शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज १४ उमेदवारांना मातोश्रीवर बोलावून एबी फॉर्मचे वाटप केले आहे.  
दिल्लीत विधानसभा निवडणुकीचे उमेदवार निश्चित करण्यासाठी भाजपच्या सुकाणू समितीची (कोअर) बैठक सुरू आहे. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे दोन नेते उपस्थित आहेत. या बैठकीत युतीच्या निर्णयासंबंधी घोषणा होण्याची शक्यता आहे. भाजपची दिल्लीत बैठक सुरू असताना शिवसेनेने आपल्या उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप केले आहे. शिवसेनेच्या या पवित्र्यामुळे भाजप काय भूमिका घेणार याकडे आता लक्ष लागले आहे.
शिवसेनेने पहिल्या यादीत शिवसेनेच्या विद्यमान आमदारांना पुन्हा संधी दिली आहे. नाशिक जिल्ह्यातील चारही आमदारांना एबी फॉर्म देण्यात आले आहे. यामध्ये सिन्नरमधील राजाभाऊ वाजे, मालेगावमधून दादा भुसे, निफाडमधून अनिल कदम आणि देवळालीमधून योगेश घोलप यांना एबी फॉर्म देण्यात आला आहे. तसेच संजय घाटगे (कागल), संग्रामसिंह कुपेकर (चंदगड), राजेश क्षीरसागर (कोल्हापूर उत्तर), चंद्रदीप नरके (करवीर), डॉ. सुजित मिचणेकर (हातकणंगले), सत्यजीत पाटील (शाहुवाडी), प्रकाश आबिटकर (राधानगरी), उल्हास पाटील (शिरोळ) यांचा समावेश आहे. औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदार संघातून संजय शिरसाट, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून पुन्हा विद्यमान आमदार तथा गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांना संधी देण्यात आली आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यातील सहा विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.
  Print


News - Rajy | Posted : 2019-09-29


Related Photos